सांगली दि.१६: कोल्हापुरात विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालयाची आवश्यकता नसल्याने ते पुण्यात स्थलांतरित करण्यास सहमती द्या अशा मागणीचे पत्र कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडे केली आहे. सदर कार्यालय पुणे ऐवजी सांगलीत स्थलांतरित करण्याची निकडीची गरज असून या स्थलांतरास सहमती मागणीचे पत्र विशेष पोलिस महानिरीक्षकांनी विभागीय आयुक्तांना द्यावे. हे कार्यालय सांगलीतच स्थलांतरित का व्हावे हे सांगताना पृथ्वीराज म्हणाले, ‘सांगली, कोल्हापूर, सातारा व सोलापूर या चारही जिल्ह्याच्या पूर्व, दक्षिण व उत्तर सरहद्दीवर कर्नाटक हद्द आहे. या भागात वारंवार सीमावादावरुन संघर्ष होत असतो. सीमावादाचा गंभीर प्रश्न हाताळण्यासाठी हे कार्यालय पुण्याहून कोल्हापूरला स्थलांतरित करण्याचा निर्णय १९६५ मध्ये होऊन १९७२ पासून हे कार्यालय कोल्हापुरात कार्यरत आहे.
सांगली हे कोल्हापूर, सातारा व सोलापूर जिल्ह्य़ातील लोकांना कामकाजाच्या दृष्टीने मध्यवर्ती ठिकाण सोयीचे आहे. पुणे हे ठिकाण या भागातील लोकांना खर्चिक व वेळखाऊ आहे.
सांगलीत या कार्यालयासाठी आवश्यक जागाही जुने पोलिस हेडक्वाॅर्टर याच बरोबर पोलिस प्रशिक्षण केंद्रही या ठिकाणी उपलब्ध आहे.
सांगली व लगतच्या जिल्ह्याच्या पूर्व, दक्षिण व उत्तर बाजूला असलेल्या कर्नाटक हद्दीवर वारंवार उफाळून येणारा सीमावाद, वाढती लोकसंख्या व गुन्हेगारी नियंत्रणासाठी सांगलीत विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाची कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आवश्यकता आहे.कोल्हापूर परिक्षेत्राचे महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी पुणे विभागीय आयुक्त मा. डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांना सांगलीत हे कार्यालय स्थलांतरित होण्यासाठी तातडीने पत्राने मागणी करावी. वेळ पडल्यास विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाचे सांगलीत स्थलांतर करण्याची मागणी घेऊन सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची मोट बांधून जनआंदोलन उभे करण्याचा इशाराही पृथ्वीराज पाटील यांनी दिला आहे.