सांगली : हजारो ठेवीदारांची घरे उद्ध्वस्त करणाऱ्या वसंतदादा शेतकरी सहकारी बँकेतील २४७ कोटी ७५ लाख रुपयांच्या अपहाराचे प्रकरण दडपण्यासाठीच काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली आहे. भाजपने ईडी, सीबीआय यंत्रणांचा धाक दाखवून काँग्रेस फोडली, असा आरोप काँग्रेसचे सांगली विधानसभा मतदार संघाचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांनी आज केला. या घडामोडींबाबतचा सविस्तर अहवाल काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांना पक्षाच्या वरिष्ठांनी सादर केल्याचे त्यांनी सांगितले.
पृथ्वीराज पाटील म्हणाले, ‘‘वसंतदादा बँक अपहार प्रकरणी बँकेच्या २७ माजी संचालक आणि मयत संचालकाचे ११ वारसदार, दोन अधिकारी अशा ४० जणांवर आरोपपत्र दाखल आहे. १०१ मालमत्तांवर सरकारने टाच आणली होती. त्या मालमत्ता जप्तीचे आदेशही दिले होते, मात्र भाजपने ही फाईल कटकारस्थान करण्यासाठी राखून ठेवली होती. या चौकशीला फडणवीस सरकारने २०१८ साली स्थगिती दिली. आता डाव साधून २०२२ साली प्रकरणाची फेरचौकशी लावली. चार वर्षे शांत झालेले चौकशीचे भूत पुन्हा एकदा मानगुटीवर बसवण्यात आले. २०२१ ला फोडाफोडी करून राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर फडणवीसांनी ही फाईल पुन्हा ओपन केली. सांगली मतदार संघासाठी षडयंत्राचा पार्ट-2 त्यावेळी सुरु झाला.’’
ते म्हणाले, ‘‘या प्रकरणात भाजपने बारकाईने कट शिजवला. ईडी, सीबीआय, जेल, लिलाव अशा धमक्या दिल्या गेल्या. माऊलींच्या बडव्यांना हाताशी धरलं. पाच-सहा बडवे भाजपकडून हाताळले गेले. युवा मंच कधी युवा मोर्चा झाला कळलेच नाही. बडव्यांनी बंडाची स्क्रीप्ट तयार केली. निवडणुकीची तयारी नसताना त्यांनी उमेदवारीसाठी दावा केला. विधान परिषदेचे सदस्यत्व नाकारले. हे का झाले? देवेंद्र फडणवीस यांच्या मिरजेतील निकटवर्तीयाने या बंडाचे डील केले. आता हे धर्मसंकट असल्याचे सांगून कृपया मतदारांची दिशाभूल करू नये. हे धर्मसंकट नसून भाजपचा कट आहे. बडव्यांनी काँग्रेससोबत केलेली गद्दारी आहे. जी महाराष्ट्रात भाजपने शिवसेनला करायला लावली, राष्ट्रवादीला करायला लावली, तेच सांगलीत घडले आहे. सांगलीकर ते सहन करणार नाहीत.’’
ते म्हणाले, ‘‘बहुजण समाज या चक्रव्यूहात अडकणार नाही, कारण आमदार सुधीर गाडगीळ यांनी मैदानातून काढलेला पळ हा वसंतदादा बँकेच्या आडून केलेला कट फसत असल्याने होता. फडणवीस यांनी स्वतः लक्ष घालून या प्रकरणात दबावतंत्र वापरले आणि बडव्यांनी बंड उभा केले. डॉ. विश्वजीत कदम यांना या बडव्यांचा डाव कळालेला आहे, म्हणूनच त्यांनी वहिनींना फितवणाप्यांची खैर नाही, असा इशारा दिला आहे.’’
ठेवीदारांचे हाल आठवा
पृथ्वीराज पाटील म्हणाले, ‘‘वसंतदादा बँकेत अपहार 247 कोटी रुपयांचा झाला. १० हजाराहून अधिक कुटुंब उद्ध्वस्त झाली, ठेवीदारांच्या मुलाबाळांना उपाशी रहावं लागलं. मुलीच्या लग्नाला पैसे मिळाले नाहीत, मुलांची शिक्षणं थांबली. ज्येष्ठ नागरिकांना औषधाला उपचाराला पैसे मिळाले नाहीत. लोकांना हे माहिती आहे. लोक शहाणे आहेत.’’