Monday, December 23, 2024
Google search engine
Homeसांगली जिल्हापंतप्रधानांच्या विकासाच्या संकल्पपूर्तीसाठी महाराष्ट्र महायुतीसोबत!

पंतप्रधानांच्या विकासाच्या संकल्पपूर्तीसाठी महाराष्ट्र महायुतीसोबत!

भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांचा विश्वास

सांगली, दि.13 (प्रतिनिधी) – महाराष्ट्राला देशातील पहिल्या क्रमांकाचे विकसित राज्य बनविण्याचा भारतीय जनता पार्टीचा संकल्प असून राज्याची अर्थव्यवस्था १ ट्रिलीयन डॉलर्सपर्यंत पोहोचविण्यासाठी गतिमान विकास हे भाजपाचे ध्येय आहे, असे भाजपाचे जिल्हाध्यक्ष श्री. प्रकाश ढंग यांनी आज स्पष्ट केले. विधानसभा निवडणुकीनिमित्त भाजपाच्या संकल्पपत्राचे प्रकाशन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह याच्या हस्ते रविवारी मुंबईत प्रकाशन झाले. पक्षाच्या संकल्प पत्राची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत श्री. प्रकाश ढंग बोलत होते.

भारतीय जनता पार्टीने दिलेली अनेक आश्वासने पूर्ण केली असल्याने देशातील जनतेने लोकसभा निवडणुकीत भाजपाला पुन्हा सत्तेचा कौल दिला आहे. केंद्रातील मोदी सरकारच्या संकल्पपूर्तीसाठी महायुतीने महाराष्ट्रातही ठोस विश्वासाने वाटचाल सुरु केली महाराष्ट्र हे मजबूत, समृद्ध, सुरक्षित राज्य बनवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला .

जम्मू काश्मीरमध्ये कलम ३७० पुन्हा लागू करण्यासाठी कॉंग्रेस आघाडीतील पक्षांनी कंबर कसली आहे, आणि तेच पक्ष आता महाराष्ट्रात संविधानाच्या नावाने कोरे कागद दाखवून डॉ . बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाचा अपमान करत आहेत. जनतेची अशी फसवणूक करणाऱ्या राहुल गांधीना, काँग्रेसला आणि त्यांच्या आघाडीला महाराष्ट्रातील मतदार थारा देणार नाहीत असा विश्वास श्री .प्रकाश ढंग यांनी यावेळी व्यक्त केला.

कलम ३७० रद्द करून भाजपाने जम्मू – काश्मीरला देशाच्या मुख्य प्रवाहात आणले, तीन तलाक पद्धती रद्द करून मुस्लिम समाजातील पीडित महिलांना दिलासा दिला, याशिवाय नागरिकत्व कायद्यात दुरुस्ती ( सीएए ) , राम मंदिर उभारणी अशी अनेक आश्वासने भारतीय जनता पार्टीच्या सरकारने पूर्ण केली आहेत, असे ते म्हणाले.

भाजपा महायुती सरकारने २०१४ मध्ये महाराष्ट्रात सत्तेवर आल्यानंतर महाराष्ट्राच्या विकासाला गती देणारे अनेक निर्णय घेतले. भारतीय जनता पार्टीने समाजाच्या सर्व घटकांचा विचार करून तयार केलेले संकल्प पत्र हे राज्याच्या जनतेचे आकांक्षा पत्र आहे, असेही श्री.प्रकाश ढंग यांनी नमूद केले. महायुती सरकारच्या काळात पूर्ण झालेल्या निळवंडे, गोसीखुर्द, टेम्भू या सिंचन योजना, कोस्टल रोड, अटल सेतू सारखे रस्ते, पूल, नार पार सारखे नदीजोड प्रकल्प यांचा आढावाही यावेळी घेत श्री प्रकाश ढंग यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली.

अंतर्विरोधाने भरलेल्या महाविकास आघाडीने सत्तेसाठी तुष्टीकरणाची विचारधारा स्वीकारली आहे, असा आरोप करून ते म्हणाले की, तेलंगणा, हिमाचल प्रदेश, कर्नाटक या राज्यांत निवडणूक काळात दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात कॉंग्रेसला अपयश आले आहे. कर्नाटकमध्ये अनेक गावे ”वक्फ” ची मालमत्ता म्हणून घोषित झाली आहेत. सामान्य माणसाची मालमत्ता वक्फ च्या घशात जाऊ नये यासाठी मोदी सरकारने वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयक आणले आहे, याकडे श्री.प्रकाश ढंग यांनी लक्ष वेधले.

या संकल्पपत्रासाठी सामान्य नागरिकांकडून सूचना मागविण्यात आल्या होत्या. ८७७ गावांतून ई मेल, पत्रे आली. ८ हजार ९३५ सूचना आल्या. संकल्प पत्रातील एकेक मुद्द्यांच्या आधारे त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी समिती नेमली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. विकसित भारतासाठी विकसित महाराष्ट्र तयार करण्याचा आमचा संकल्प या संकल्प पत्रातून स्पष्ट झाला असून आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्वप्ने प्रत्यक्षात आणण्याचे काम या संकल्प पत्रातून होत आहे, असे ते म्हणाले. महाराष्ट्राची सुजाण जनताही या संकल्पांच्या पूर्ततेसाठी महायुतीसोबत राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

गतिमान विकासाचा रोडमॅप

गरीब, महिला, युवक, शेतकरी, कष्टकरी, ज्येष्ठ नागरिक, अनुसूचित जातीजमाती, आणि राज्यातील सर्व समाजघटकांसाठी लाभाच्या योजना, पायाभूत सुविधांचा वेगवान विकास, औद्योगिक विकासासाठी विशेष सवलती, विज्ञान-तंत्रज्ञान व माहिती-दळणवळण क्षेत्रातील अत्याधुनिक साधनांच्या वापर व विकासास प्रोत्साहन, आरोग्य व शिक्षणक्षेत्रासाठी विशेष योजना, धार्मिक आस्थांच्या जपणुकीची हमी आणि सामाजिक जीवनमान उंचावणाऱ्या मूलभूत गरजांच्या पूर्ततेचा संकल्प अशा सर्वसमावेशक हमीचे भाजपचे संकल्पपत्र म्हणजे महाराष्ट्राच्या गतिमान विकासाचा रोडमॅप ठरेल असा दावा श्री.प्रकाश ढंग यांनी केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments