सांगली दि.७ (प्रतिनिधी) – अपक्ष उमेदवारांना मदत म्हणजे भाजपाला मदत केल्यासारखे आहे. सांगली जिल्ह्यातील व सांगली विधानसभा क्षेत्रातील सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान व प्रचार कामी सहकार्य करणेचे आहे. माजी नगरसेवक व पक्षाचे स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदाधिकारी, सदस्य व कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे काम करावे, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल असा गंभीर इशारा पक्ष निरीक्षकांनी दिला.
सांगली विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या प्रचार यंत्रणेचा आढावा घेण्यासाठी आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने नियुक्त केलेल्या निरीक्षकांची बैठक आज काँग्रेस भवनमध्ये संपन्न झाली. पश्चिम महाराष्ट्र निरीक्षक ना. एम. बी. पाटील मंत्री कर्नाटक, दयानंद पाटील सरचिटणीस कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटी, आमदार बी. आर. पाटील एआयसीसी निरीक्षक , डॉ. सेलीयंथा हातकणंगले निरीक्षक, मा. खा. करणसिंग सांगली विधानसभा क्षेत्र निरीक्षक, आ. गणेश हुक्कीरे हे बैठकीत उपस्थित होते.
महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांनी सांगली मतदारसंघातील प्रचार यंत्रणेचा आढावा सादर केला. ते म्हणाले, ‘अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने राज्यातून निष्क्रिय महायुतीचे सरकार सत्तेतून हद्दपार करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी काँग्रेस कार्यकर्ते एकसंध होऊन महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी परिश्रम घेतले पाहिजेत. या कामी लक्ष ठेवण्यासाठी निरीक्षक पथक सांगलीत दाखल झाले आहे.
ना. बी. एम. पाटील यांनी महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांचे काम करणे बंधनकारक राहील. अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल असा गंभीर इशारा दिला. बंडखोरी खपवून घेतली जात नाही. बूथ सक्षम करा. पृथ्वीराजबाबा पाटील यांनी पक्षासाठी व सांगलीसाठी खूप चांगले काम केल्याने त्यांना उमेदवारी दिली आहे. त्यांना निवडून आणणे म्हणजे पक्षाचा विजय होय. बंडखोरीची चर्चादेखील करू नका. यावेळी करणसिंह, आमदार बी. आर. पाटील व दयानंद पाटील आणि डॉ. सेलिथंना यांनी निवडणूक जिंकण्यासाठी काय करता येईल या विषयावर मार्गदर्शन केले. स्वागत बिपीन कदम तर आभार पैगंबर शेख यांनी मानले.
यावेळी सांगली जिल्ह्यातील व विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे पदाधिकारी, सदस्य, विविध आघाडी व सेलचे प्रमुख, महिला आघाडी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.