दोन्ही गटातील कार्यकर्ते आक्रमक; कॉंग्रेसमध्ये बंडखोरी अटळ?
सांगली, दि.24 (प्रतिनिधी) – जेमतेम 6 ते 7 महिन्यापुर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत सांगली जिल्ह्यातील कॉंग्रेस एकसंध झालेली दिसत होती. जिल्ह्यातील दोन प्रमुख युवा नेत्यांनी लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी बजावली होती. परंतु ही एकसंधता काही काळापुरतीच होती की काय? असा सवाल सामान्य सांगलीकरांना पडला आहे. लोकसभा निवडणुकीत झालेल्या एकीचे विधानसभा निवडणुकीत विसर्जन करून कॉंग्रेसमधील श्रीमती जयश्रीताई पाटील आणि कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील हे दोन गट एकमेकांविरुद्ध निवडणूक लढविण्यास सज्ज झाले आहेत.
सोमवारी (दि.21) जयश्रीताई पाटील यांच्या निवासस्थानी म्हणजेच विजय बंगल्यावर माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील आणि प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत जयश्रीताईंना विजयी करायचा निर्धार पक्का करण्यात आला. जयश्रीताई पाटील यांनी सांगली विधानसभा मतदारसंघातून लढायचा निर्धार केला असून त्यांच्या विजयासाठी माजी मंत्री प्रतीक पाटील सक्रिय झाले आहेत. प्रतिक पाटील यांनी जयश्रीताईंच्या निवडणुकीचे नियोजन हाती घेतले असल्याची चर्चा आहे.