Monday, December 23, 2024
Google search engine
Homeसांगली जिल्हासांगली विधानसभा : भाजपचं ठरलं, काँग्रेसचं अडलं

सांगली विधानसभा : भाजपचं ठरलं, काँग्रेसचं अडलं

बंडखोरी शमणार की, लोकसभेचा ’सांगली पॅटर्न’ विधानसभेत दिसणार?

सांगली, दि.21 (सलमान अमीन) – विधानसभा निवडणूकीसाठी भाजपाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यामध्ये सांगलीतून सुधीर गाडगीळ यांची उमेदवारी निश्‍चित झाली आहे. तर काँग्रेसचं मात्र अद्याप उमेदवार निश्‍चित नसल्यामुळे घोडं अडल्याचे दिसून येत आहे. सांगली विधानसभा निवडणूकीत भारतीय जनता पार्टीने विद्यमान आमदार सुधीरदादा गाडगीळ यांची उमेदवारी जाहीर केली असून निवडणूक लढविण्यास नकार दिलेल्या उमेदवाराला भाजपाने निवडणूक रिंगणात उतरविल्याने गुडघ्याला बाशिंग बाधलेल्या इच्छुकांचा पुरता भ्रमनिरास झाला आहे. इच्छूक उमेदवार आणि त्यांचे समर्थक त्यापद्धतीची निराशा सोशल मिडीयाच्या माध्यमातून व्यक्त करीत असल्याचे दिसून येते.

काँग्रेसचा तिढा कायम

सांगली विधानसभा निवडणूकीसाठी भाजपाने आपला उमेदवार जाहीर केला असला तरी काँग्रेसमध्ये उमेदवारीसाठी चांगलीच रस्सीखेच सुरू आहे. सांगलीची जागा महाविकास आघाडीकडून काँग्रेसला सोडण्यात आली असली तरी काँग्रेसमध्येच दोन तगडे दावेदार असल्याने उमेदवारी कोणाला मिळणार? ह्याची चर्चा सांगली शहरातील चौका-चौकात रंगताना दिसत आहे.

लोकसभेची पुनरावृत्ती विधानसभेला?

गत लोकसभा निवडणूकीत महाविकास आघाडतील दोन घटक पक्षात उमेदवारीसाठी चांगलेच वातावरण तापले होते. काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने उमेदवारी घोषीत केल्याने काँग्रेस आणि शिवसेना उबाठा यांच्यातील कलगीतुरा संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला. अखेर बंडखोरीने याचा शेवट झाला असला तरी तशीच काहीशी परिस्थिती आगामी विधानसभा निवडणूकीत निर्माण होत असल्याचे दिसून येते. कारण एकाच पक्षातील दोन तगडे उमेदवार असल्याने पक्षाकडून अधिकृत उमेदवारीची लॉटरी कोणाला लागणार? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

नेत्यांची भूमिका गुलदस्त्यात

लोकसभा निवडणूकीत जिल्ह्यातील काँग्रेसचे काही प्रमुख नेते आणि कार्यकर्ते छुप्या पद्धतीने बंडखोर उमेदवाराच्या मागे उभे होते. तर काही नेते मंडळी खुलेआमपणे काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांचा प्रचार करीत होते. त्यामुळे विधानसभा निवडणूकीत कोणता नेता कोणाच्या मागे ठाम उभा राहणार? हे सध्यातरी कोणीच सांगू शकत नाही. त्यामुळे विधानसभा निवडणूकीत काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळाली तरी जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांची भूमीका काय असणार? आणि काँग्रेस पक्षाच्या दोन तगड्या उमेदवारा पैकी ज्यांना उमेदवारी निश्चित होईल त्या उमेदवाराच्या मागे माघार घेणाऱ्या उमेदवारांचे कार्यकर्ते इमानेइतबारे काम करतील का? यावर बर्‍याच गोष्टी अवलंबून असणार आहेत. म्हणजेच पक्षाने दिलेली उमेदवारी सर्वमान्य असेल की, लोकसभेतील ‘सांगली पॅटर्न’ पुन्हा विधानसभेतही पहायला मिळेल? अशी शंका उपस्थित केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments