मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीची तारीख काही दिवसात जाहीर होण्याची शक्यता असून त्यापार्श्वभूमीवर राज्यात दसरा मेळाव्याच्या माध्यमातून राजकीय प्रचाराच्या तोफा धडाडणार आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर तर बीकेसी मैदानावर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडणार आहे. मराठवाड्यात भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे आणि मंत्री धनंजय मुंडे या भावाबहिणींचा एकत्रित मेळावा पहिल्यांदा होत आहे. दसऱ्याच्याच मुहूर्तावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे ‘पॉडकास्ट’च्या माध्यमातून जनतेशी संवाद साधणार असल्याने यंदाचा दसरा विधानसभा निवडणुकीच्या वाऱ्याची दिशा निश्चित करणारा ठरणार आहे.
शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने प्रसिद्ध केलेल्या ‘टिझर’मध्ये ‘महाराष्ट्राचा एकमेव पारंपरिक दसरा मेळावा असल्याचा दावा करण्यात आला असून शिवसेनेकडून पुन्हा हिंदुत्वाची साद घालण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीसोबत जाऊन शिवसेनेला काँग्रेसच्या दावणीला बांधले होते. धनुष्यबाणाच्या साहाय्याने मुख्यमंत्री शिंदेंनी शिवसेनेची सुटका केल्याची कार्टून चित्रफीत तयार करण्यात आली आहे.
पंकजा मुंडे यांच्या मेळाव्यात प्रथमच धनंजय मुंडे पंकजा मुंडे यांच्या भगवान भक्तिगडावरील मेळाव्याचे हे दहावे वर्ष आहे. यंदाच्या मेळाव्याला त्यांचे बंधू पालकमंत्री धनंजय मुंडे प्रथमच येत आहेत. या मैदानावर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली असून व्यासपीठ व हेलिपॅडची उभारणी करण्यात आली आहे.
बीड जिल्ह्यातील श्रीक्षेत्र नारायणगडावर शुक्रवार (ता. ११) पासूनच भाविक मुक्कामी पोचले असून काही भाविक शहरात व्यवस्था केलेल्या मंगल कार्यालयांत वास्तव्यास आहेत. श्रीक्षेत्र नारायणगडावर महंत शिवाजी महाराज व मनोज जरांगे पाटील हे हेलिकॉप्टरने येतील. या मेळाव्यांच्या भूमीवर पोलिस दल सतर्क झाले आहेत. सुमारे दोन हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त आत आला आहे.