अवकाळी व गारपीटग्रस्त शेती पिकाचे पंचनामे करा : प्रभाकर पाटील

नुकसानग्रस्त द्राक्ष बागांची पाहणी; जिल्हाधिकाऱ्यांना पंचनामे संदर्भात निवेदन

0
86
सांगली – बुधवारी दुपारी झालेल्या अवकाळी पावसाने व गारपिटीने द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश देऊन शासन स्तरावर मदत मिळण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी जिल्हाधिकारी राजा दया निधी यांच्याकडे तासगाव विधानसभा क्षेत्र भाजपचे अध्यक्ष प्रभाकर पाटील यांनी निवेदना द्वारे केली आहे. दरम्यान गुरुवारी रात्री उशिरापर्यंत प्रभाकर पाटील यांनी पडत्या पावसात नुकसानग्रस्त द्राक्ष बागांची पाहणी केली.
बुधवारी दुपारी मनेराजुरी परिसर व सावळे परिसरात झालेल्या गारपीट व अति पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले द्राक्ष बागेत तर शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आला प्रभाकर पाटील हे रात्री उशिरापर्यंत या परिसरातील द्राक्ष बागांची पाहणी करून शेतकऱ्यांना धीर देत होते त्यांनी रात्री तहसीलदार व संबंधित कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला होता. गुरुवारी दुपारी त्यांनी जिल्हाधिकारी दयानिधी यांची भेट घेऊन यासंदर्भात निवेदन दिले.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात प्रभाकर पाटील यांनी म्हटले आहे की, बुधवारी सांगली जिल्हयातील तासगांव तालुक्यामध्ये ठिकठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस व गारपीट झाली. यामुळे तासगांव तालुक्यातील द्राक्षबागा व सर्वच पीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे शेतात पाणी साचून राहिल्याने हाता तोंडाशी आलेले पीक वाया जाणेची दाट शक्यता निर्माण झाली आहे. शासकीय स्तरावरुन सदर झालेल्या शेती पीकांच्या नुकसानीचा पंचनामा तात्काळ होवून त्याचा अहवाल लवकरात लवकर शासनाकडे सादर होणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच सदर झालेल्या नुकसानीची शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देवून त्यांना आर्थिक संकटातून सावरण्यासाठी मदत होणेही गरजेचे आहे. तासगांव तालुक्यात द्राक्ष बागेसह हंगामी पीके घेतली जातात. शेतकरी या शेतीपीकांवर अवलंबून असून झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटेमुळे तो हवालदील झालेला आहे.
तरी तासगांव तालुक्यातील अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे ठिकठीकाणी झालेल्या शेतीपीकांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळून मदत व्हावी, अशी विनंती करण्यात आली.