चंढीगड : हरिणाया विधानसभेमध्ये पुन्हा एकदा भाजपने बाजी मारल्याचं स्पष्ट झालं असून जवळपास 49 जागा जिंकल्या आहेत. भाजपने बहुमताचा 46 हा आकडा गाठला. तर काँग्रेसला 36 जागांवर समाधान मानाव हरियाणातल्या विधानसभा निवडणुकीत विजयाची हॅटट्रिक करत भाजप तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करणार आहे. शेतकरी आणि कुस्तीपटूंच्या आंदोलनामुळे हरियाणात भाजपविरोधात वातावरण असल्याचं बोललं जात होतं. सगळ्या एक्झिट पोलमध्येही भाजपचा धुव्वा उडवत काँग्रेसचं सरकार येणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. पण सगळ्या शक्यता आणि अंदाज खोटे ठरवत हरियाणात भाजपनं घवघवीत यश मिळवलंय.
निकालात सकाळच्या सत्रात काँग्रेस आघाडीवर होती, पण नंतर भाजपनं मोठी झेप घेतली. लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यानं हरियाणाच्या भाजपचा हा पहिला मोठा विजय आहे. हरियाणाच्या नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी विजयादशमीच्या दिवशी 12 ऑक्टोबरला होऊ शकतो. आत्तापर्यंत संभाव्य मंत्रिमंडळाला अंतिम रूप दिल्यानंतर तारीख ठरवली जाईल, मात्र 12 तारखेला शपथ घेणार असल्याची माहिती आहे.
वास्तविक, गेली 10 वर्षे हरियाणात भाजपची सत्ता होती. अशा स्थितीत अँटी इन्कम्बन्सीसह अनेक बाबी समोर आल्याने भाजपचे नुकसान होताना दिसत होते. पण भाजपने हरियाणा निवडणुकीच्या 7 महिने आधी अशी खेळी केली, ज्यामुळे काँग्रेस अडचणीत आली.
हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या 7 महिने आधी भाजपने अचानक तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांना पदावरून हटवून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. खरे तर भाजपने 2019 मध्येही खट्टर यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली होती. तेव्हा भाजपला बहुमत मिळाले नव्हते. मात्र, जेजेपीच्या पाठिंब्याने भाजपला सरकार स्थापन करण्यात यश आले.
2024 मध्ये भाजपला कोणताही धोका पत्करायचा नव्हता. त्यामुळे निवडणुकीच्या 7 महिने आधी खट्टर यांना हटवून नायबसिंग सैनी यांच्याकडे राज्याची कमान सोपवण्यात आली. सैनी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने हरियाणा विधानसभेची निवडणूक लढवली आणि एका नव्या चेहऱ्याने जनतेसमोर हजर झाले. नायबसिंग सैनी यांच्यावर जनतेने विश्वास व्यक्त केल्याचे निकालावरून स्पष्ट झाले आहे. यावेळी भाजप पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करण्यात यशस्वी होताना दिसत आहे.
हरियाणात भाजपला घवघवीत यश मिळाल्यानं महाराष्ट्रात भाजपचा जल्लोष सुरू झालाय. हरियाणातल्या विजयामुळे भाजपचा आत्मविश्वास वाढलाय. लोकसभेतल्या फेक नरेटीव्हचं उत्तर आता थेट नरेटीव्हनं दिलंय, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावलाय. आता महाराष्ट्रातही महायुतीचा असाच विजय होईल, असा भाजपला विश्वास वाटतोय. लोकसभा निवडणुकीत बसलेल्या फटक्यानंतर भाजपचा हरिणाच्या रुपानं पहिलाच मोठा विजय आहे. तसंच जम्मू-काश्मीरमध्येही भाजपची सत्ता आली नसली तरी तिथं त्याच्या जागांमध्ये मात्र वाढ झालीय.