सांगली, दि. १४ (प्रतिनिधी) : कृष्णा वारणा नदीच्या तिरावर वसलेल्या हरिपूर गावात अपक्ष महिला उमेदवार जयश्री मदन पाटील यांचा प्रचार दौरा पार पडला. यावेळी गावातून प्रचार फेरी काढण्यात आली. हरिपूर गावच्या विकासासाठी मी कटिबद्ध असून येणाऱ्या काळात गावचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाही. प्रलंबित विकासकामे मार्गी लावून हरिपूर गावचा सर्वांगीण विकास करू असे प्रतिपादन जयश्री पाटील यांनी केले.
ग्रामस्थांनी जयश्री पाटील यांचे जल्लोषात स्वागत केले. हनुमान मंदिर येथे प्रचाराचा प्रारंभ करण्यात आला. धनगरी ढोल व फटाक्यांची आतिषबाजीत प्रचार फेरी निघाली. प्रचार फेरी ग्रामस्थांनी मोठा सहभाग घेतला होता.यावेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.जागोजागी महिलांनी औक्षण केले.
यावेळी जयश्री पाटील पुढे म्हणाल्या, हरिपूर गावाने स्व.मदन पाटील यांना मोठी साथ दिली होती. तशीच साथ मलाही द्या. तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळेच माझा विजय होईल. मला पुढील पाच वर्षे काम करण्याची संधी द्या. पाच वर्षात मतदारसंघांचा चौफेर विकास करून युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार आहे, महिलांना घरगुती व्यवसाय सुरु करण्यासाठी पाठबळ देऊ अशी ग्वाही जयश्री मदन पाटील यांनी दिली.
यावेळी संजय सावंत म्हणाले, विद्यमान आमदार गाडगीळ यांची गावात भरपूर नाराजगी आहे. गावात ठराविक लोकांना हाताशी धरून कारभार सुरू आहे. गावच्या हितापेक्षा कार्यकर्ता जगला पाहिजे ही त्यांची भूमिका आहे. ऐन दिवाळी गावाला पाणीटंचाईला सामोरे जावे लागले. टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. सांगली रस्त्याची मागणी नसतानाही टक्केवारीसाठी रस्त्याचे काम सुरू झाले. मुदत संपूनही रस्त्याचे काम अपुरे आहे. मूलभूत सुविधे पासून गाव वंचित आहे. गटारी, पिण्याच्या पाण्याची समस्या, तरुणांना रोजगार या सुविधा मिळाल्या पाहिजेत.
यावेळी संजय सावंत, नितीन खोत, संपत चौधरी, संभाजी कारंडे, माजी सभापती मीना बावधनकर, गणेश मोहिते, संभाजी मोहिते, गजानन फाकडे, राजाराम सूर्यवंशी, रुपेश बावधनकर, कुमार सूर्यवंशी, यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.