सांगली, दि.14 (प्रतिनिधी) – विधानसभा निवडणुकीमध्ये मराठा समाजातील कोणत्याही संघटनेने अथवा व्यक्तीने कोणत्याही उमेदवाराला मराठा समाज म्हणून पाठिंबा देऊ नये असा निर्णय सांगलीतील मराठा समाजातील प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला पद्माकर जगदाळे, नितीन चव्हाण, सतीश साखळकर, अतुल माने,शरद देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
याबाबत माहीती देताना पद्माकर जगदाळे यांनी सांगितले, सध्या विधानसभा निवडणुका सुरु आहेत. जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुती, महाविकास आघाडी यासह इतर काही राजकीय पक्ष व अपक्ष उमेदवार निवडणूक लढवीत आहेत. या सर्वच पक्षांमध्ये व अपक्षांच्या बरोबर मराठा समाजाचे अनेक बांधव कार्यरत आहेत. त्यामुळे मराठा समाजाची या विधानसभा निवडणुकीतील भूमिका काय असावी यावर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी पंचमुखी मारुती रोडवरील कष्टकऱ्यांची दौलत या ठिकाणी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीस नितीन चव्हाण, विजय साळुंखे, विजय पाटील, सतीश साखळकर, शिवाजी मोहिते, उदय जाधव, सच्चिदानंद कदम, विश्वजीत पाटील, अतुल माने, शरद देशमुख, प्रवीण पाटील, उदय पाटील, राहुल पाटील, ऋषिकेश पाटील, चंद्रकांत सूर्यवंशी, ॲड. भाऊसाहेब पवार, राजेश जगदाळे, विकास सूर्यवंशी, उमेश चव्हाण, भरत कुबडगे, शिवप्रसाद पाटील यांच्यासह बहुतांश- प्रमुख राजकीय पक्षातील मराठा समाजातील मान्यवर उपस्थित होते.
मराठा समाजाची या विधानसभा निवडणुकीमध्ये काय भूमिका असावी याबाबत या बैठकीत चर्चा झाली. मराठा आरक्षणासाठी मोठा लढा उभा केलेले मनोज जरांगे पाटील यांनी हा निवडणूक विषयातून डोक्यातून काढला आहे असे सांगितले आहे. महाविकास आघाडी महायुती अपक्ष असे कोणालाही पाठबळ दिलेले नाही असे जाहीर केलेले आहे. मराठा समाजाने स्वतः विचार करून निर्णय घ्यावा असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत त्याबाबत चर्चा झाली.
सांगली जिल्ह्यामध्ये आठ विधानसभा मतदारसंघ असून या सर्व ठिकाणी महाविकास आघाडी, महायुती तसेच अपक्ष व इतर काही राजकीय पक्षांचे लोकप्रतिनिधी निवडणूक लढवत आहेत. अशावेळी समाज म्हणून कोणा एकाला पाठिंबा देऊन समाजामध्ये फूट पडू नये असा विचार सर्वांमध्ये पुढे आला. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत मराठा समाज वतीने म्हणून कोणीही कोणाला पाठिंबा देऊ नये. समाजात ज्या काही वेगवेगळ्या संघटना, वेगवेगळे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांनी समाजाच्या नावावर कोणालाही पाठिंबा देऊ नये अथवा समाजाचा नेता म्हणून प्रचार करू नये. वैयक्तिक पातळीवर वैयक्तिक इच्छेनुसार काम करावे, प्रचार करावा मात्र ती समाजाची भूमिका आहे असे सांगू नये. मराठा समाज म्हणून कोणालाच पाठिंबा देऊ नये व तसा पाठिंबा कोणीही जाहीर करू नये. तसे केल्यास तो निर्णय एकुणच सकल मराठा समाजाचा मान्य नसेल असा निर्णय यावेळी घेण्यात आला.
मराठा समाजातील जिल्ह्यातील सर्व संघटना व सामाजिक कार्यकर्ते प्रमुख नेते पदाधिकारी यांना आवाहन करण्यात येते की मराठा समाज म्हणून कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा न देता वैयक्तिक पातळीवर आपल्या स्वतःच्या भूमिकेप्रमाणे काम करावे.