शिरोळ – राज्य शासनाच्या कॅबिनेट मंत्रिमंडळात वृत्तपत्र विक्रेते व पत्रकार यांच्यासाठी स्वतंत्र महामंडळाला मान्यता मिळालेबद्दल येथील छत्रपती शिवाजी चौकात शिरोळ तालुका वृत्तपत्र विक्रेता – एजंट संघ तसेच शिरोळ तालुक्यातील सर्व पत्रकार यांच्यावतीने नागरिकांना साखर – पेढे वाटून तसेच फटाके फोडून निर्णयाचे स्वागत करून आनंद व्यक्त करण्यात आला.
यावेळी तालुका वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे सचिव धनंजय सावंत यांनी स्वागत केले. तालुकाध्यक्ष रायाप्पा बाळीग्रे, उपाध्यक्ष नागेश गायकवाड, खजिनदार चिदानंद कांबळे यांच्यासह ज्येष्ठ पत्रकार डॉ दगडू माने, सागर बाणदार यांची भाषणे झाली. शासनाच्या कॅबिनेट मंत्रिमंडळात वृत्तपत्र विक्रेता व पत्रकारांसाठी स्वतंत्र दोन महामंडळाला मान्यता मिळाली. या निर्णयाचे स्वागत आहे. मात्र या महामंडळामध्ये अहोरात्र परिश्रम घेऊन वृत्तपत्र सेवेत काम करणाऱ्या वृत्तपत्र विक्रेता, एजंट आणि पत्रकारांसाठी कल्याणकारी योजना राबविण्यात याव्यात. जेणेकरून त्यांचा सन्मान होऊन त्यांना श्रमाचे मोल मिळाले पाहिजे. अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
यावेळी पत्रकार महेश पवार, अविनाश सूर्यवंशी, कृष्णात हेगाना, दादासो कांबळे, राजेंद्र प्रधान, बाळासाहेब कांबळे आदी उपस्थित होते.