सांगली, दि.८ : सांगलीसाठी लवकरच विमानतळ, हळद बोर्डाची शाखा, आणि मोठा उद्योग अशी आश्वासने केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शहा यांनी आज येथील जाहीर सभेत दिली. शहा यांच्या या घोषणांना सभेस प्रचंड संख्येने उपस्थित जनतेने टाळ्यांचा कडकडाट करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
सांगली विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या प्रचारासाठी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर आज दुपारी शहा यांची जाहीर सभा झाली. दुपारी अडीच वाजता कड्ङ्क उन्हात झालेल्या या सभेस नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. त्यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. सुधीर दादांनाच सांगलीतून पुन्हा विजयी करा, या अमित शहा यांच्या आवाहनालाही उपस्थित आणि घोषणांच्या निनादात दणदणीत प्रतिसाद दिला.
सांगलीजवळ विमानतळ, रोजगारनिर्मिती करू शकणारा मोठा उद्योग आणि हळदीसह सर्व प्रकारच्या शेतीमालाला अधिक प्राधान्य या सांगलीकरांच्या प्रमुख मागण्या आहेत. त्यांनाच अमित शहा यांनी आज स्पर्श केला.
अमित शहा यांचे व्यासपीठावर आगमन झाले त्यावेळीच सभास्थानी गर्दी ओसंडून वाहत होती. सभा सुरू झाल्यावरही शहरातून तसेच मतदार संघाच्या ग्रामीण भागातून लोकांचे आणि कार्यकर्त्यांचे जथेच्या हातात भाजप शिवसेना राष्ट्रवादी जनसुराज्य पक्ष आरपीआय यांचे या पक्षांचे झेंडे घेऊन येतच होते. शहरातून तसेच ग्रामीण भागातून मोटार सायकल रॅली काढून शेकडो कार्यकर्ते सभास्थानी आले होते.
शहा यांनी आज अतिशय आक्रमक पवित्र्यात भाषण केले. लोकांशी त्यांचा संवादही सुरू होता. आमदार गाडगीळ, मिरज मतदार संघातील भाजपचे उमेदवार डॉ. सुरेशभाऊ खाडे तसेच तासगाव कवठेमहांकाळ मतदार संघातील राष्ट्रवादीचे उमेदवार संजयकाका पाटील या तिघांनाही त्यांनी स्टेजवर पुढे येण्यास सांगितले. त्यांनी लोकांना अभिवादन केले. त्यावेळी लोकांनीही उभे राहून भाजप महायुतीच्या विजयाच्या घोषणा दिल्या.
शहा म्हणाले सांगलीत सुधीर दादांना मत म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मत हे लक्षात ठेवा सुधीर दादांना मत म्हणजे देशाच्या सुरक्षेला देशाच्या समृद्धीला महाराष्ट्राच्या उन्नतीला मत याची खूणगाठ बांधा.
काश्मीर मधील ३७० कलम हटवण्याचा निर्णय योग्य होता की नाही असे शहा यांनी विचारताच लोकांनी हात उंचावून योग्य होता, असे उत्तर दिले. राम मंदिर बांधले पाहिजे होते की नाही असे त्यांनी विचारताच पुन्हा एकदा लोकांनी अयोध्येत राम मंदिर बांधले ते योग्य केले असे सांगितले.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि तो पक्ष संविधान विरोधी आहे. तसेच आरक्षण संपवण्याचा त्यांचा अजेंडा आहे असे शहा म्हणाले. ते म्हणाले, संविधानाचे रक्षण हे मोदी सरकारचे प्रधान कर्तव्य आहे. काँग्रेसवाल्यांनी कितीही प्रयत्न केले तरी एसटी, एसटी आणि ओबीसी यांच्यासाठीच्या आरक्षणाला मोदी सरकार धक्का लावू देणार नाही.
व्यासपीठावर भारतीय जनता पक्षाचे नेते माजी आमदार दिनकरतात्या पाटील, माजी आमदार नितीन शिंदे, प्रदेश संघटन मंत्री मकरंद देशपांडे, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, भाजप महिला आघाडीच्या प्रदेश सचिव स्वाती शिंदे, भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार, भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष धीरज सूर्यवंशी, भाजपचे जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य प्रकाश बिरजे, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे, माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, विष्णू माने, बिरेंद्र थोरात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे, जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष आणि प्रदेश सचिव जगन्नाथ ठोकळे, भाजपच्या नेत्या सौ. नीता केळकर, पैलवान दिलीप सूर्यवंशी, रावसाहेब घेवारे, व्यासपीठावर उपस्थित होते.
आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी शहा यांचे शाल श्रीफळ आणि श्री गणेशाची मूर्ती देऊन स्वागत केले.
आमदार गाडगीळ यांनी स्वागत केले. सांगली विधानसभा मतदारसंघातील सर्व लाडके भाऊ आणि लाडक्या बहिणी यांना संबोधित करण्यासाठी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येथे उपस्थित राहिले याबद्दल त्यांचे आभारही मानले.