मुंबई – गेल्या पाच वर्षांपासून रखडलेल्या राज्यपाल नियुक्त विधानपरिषद आमदारकीला अखेर आज मुहुर्त मिळाला आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून राज्यपाल नियुक्त विधानपरिषद आमदारकीसाठी 12 आमदारांची नियुक्ती रखडली होती. अखेर आज राज्यपाल नियुक्ती आमदारकीसाठी 12 पैकी 7 नेत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज महाराष्ट्रातील राज्यपाल नियुक्त आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडला. दुपारी 12 वाजता विधानभवनातील सेंट्रल हॉलमध्ये हा सोहळा आयोजित करण्यात आला.
सभागृहाच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांच्या हस्ते शपथ घेतलेल्या सदस्यांमध्ये चित्रा वाघ, विक्रांत पाटील, बाबूसिंग महाराज राठोड, मनीषा कायंदे, हेमंत पाटील, पंकज भुजबळ, इद्रिस नायकवडी यांचा समावेश आहे.
राज्यपाल नियुक्त 12 पैकी सात सदस्यांनी आज विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ घेतली. ज्यामध्ये भाजपच्या तीन तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील प्रत्येकी दोन सदस्यांनी आमदारकीची शपथ घेतली. विधानपरिषद उपाध्यक्षा निलम गोऱ्हे यांनी ही शपथ दिली. या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित होते. राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीवरुन एक प्रकरण आगोदरच न्यायालयात प्रलंबीत आहे. हे प्रकरण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या नेतृत्वाखालील महाविकासआघाडी सरकारने 12 नावे राज्यपालांकडे दिली होती. ज्यावर त्यांनी कोणताही निर्णय घेतला नव्हता. दरम्यान, आगोदरच्या सरकारने दिलेली यादी पाठिमागे घेऊन या विद्यमान राज्य सरकारने पुन्हा एकदा नवा नवी नावे राज्यपालांकडे सादर केली होती. ज्यावरुन आता शिवसेना पुन्हा एकदा न्यायालयात गेल्याचे समजते.