Sunday, December 22, 2024
Google search engine
Homeप्रादेशिकमुख्यमंत्र्यांच्या अधिकाऱ्यांना सत्तांतराची चाहूल? महत्त्वाच्या विभागात लावून घेतली वर्णी

मुख्यमंत्र्यांच्या अधिकाऱ्यांना सत्तांतराची चाहूल? महत्त्वाच्या विभागात लावून घेतली वर्णी

मुंबई – लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारच्या पराभवाची पुनरावृत्ती होण्याच्या शक्यतेने मुख्यमंत्री कार्यालयातील तसेच मंत्री आस्थापनेवरील अधिकाऱ्यांनी आपली वर्णी मंत्रालयात महत्त्वाच्या विभागात लावून घेतली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सामान्य प्रशासन विभागाने सोमवारी (14 ऑक्टोबर) या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. त्यामुळे या अधिकाऱ्यांना विधानसभा निवडणुकीआधीच सत्तांतराची चाहूल लागल्याची जोरदार चर्चा मंत्रालयात आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रालयातील कार्यलयात सहसचिव म्हणून कार्यरत राहून गृह विभाग सांभाळणारे व्यंकटेश भट यांनी आपली बदली उद्योग, ऊर्जा विभागात करून घेतली आहे. याशिवाय मुख्यमंत्री कार्यालयातील आणखी एक सहसचिव कैलास बिलोणीकर यांची बदली जलसंपदा विभागात झाली आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे खासगी सचिव मंगेश शिंदे यांनी सहसचिव आपली वर्णी शालेय शिक्षण, क्रीडा विभागात लावून घेतली आहे.

मुख्यमंत्री कार्यालयातील उपसचिव सचिन सहस्रबुद्धे, चंद्रशेखर तरंगे, मनोजकुमार महाले यांची बदली अनुक्रमे ग्रामविकास, गृहनिर्माण, महसूल आणि वन विभागात झाली आहे. याशिवाय मुख्यमंत्री कार्यालयात प्रतिनियुक्तीवर रुजू झालेले अवर सचिव सुधीर शास्त्री यांची सेवा नगरविकास विभागात, धीरज अभंग यांची गृहनिर्माण विभागात,नीलेश पोतदार यांची पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागात, प्रवीण पाटील यांची महसूल आणि वन विभाग तर वृषाली नवाथे यांची वित्त विभागात प्रत्यावर्तीत करण्यात आली आहे.

निवडणुकीपूर्वीच अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री, मंत्री कार्यालयातील आपले बस्तान हलविले आहे. राज्यात निवडणूक होऊन नवे सरकार सत्तेत येण्यापूर्वीच या अधिकाऱ्यांनी मंत्रालयात महत्त्वाच्या जागी आपला मुक्काम हलविला आहे. आपली बदली करून घेऊन या अधिकाऱ्यांनी महायुती सरकार पुन्हा सत्तेत येण्याची आशा सोडून दिली आहे. दरम्यान, मंत्र्यांच्या विरोधामुळे साडेतीन महिन्यांपासून रोखून धरण्यात आलेल्या सहसचिव, उपसचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी आज मंगळवारी (15 ऑक्टोबर) पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र आणि झारखंडमधील विधानसभेची तारीख जाहीर केली आहे. महाराष्ट्रात पुढील महिन्यात 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून 23 तारखेला मतमोजणी होणार आहे. यासाठी 22 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज भरता येणार असून 29 ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटी तारीख असणार आहे. यानंतर 30 ऑक्टोबर रोजी अर्जाची छाननी होईल आणि 4 नोव्होंबर रोजी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे, असे राजीव कुमार यांनी स्पष्ट केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments