कोल्हापूर : विधानसभेत मुस्लिम ओबीसींना प्रतिनिधित्व मिळण्यासाठी महाविकास आघाडीने मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनला राज्यात १० ते १५ जागा सोडाव्यात, अशी मागणी ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष इकबाल अन्सारी यांनी पत्रकार परिषदेत केली.
अन्सारी म्हणाले, लोकसभा निवडणुकीत जातीयवादी पक्षांना रोखण्यासाठी मुस्लिम समाजाने एकजूट दाखवून इंडिया आघाडीला साथ दिली. आता या समाजाचा महाविकास आघाडीकडे जागा मागण्याचा हक्क आहे.
आघाडीतील प्रत्येक घटक पक्षाने आपल्या पक्षातील मुस्लिम ओबीसी नेत्यांना संधी द्यावी किंवा ऑर्गनायझेशनला जागा सोडाव्यात; अन्यथा आम्ही उमेदवार उभे करणार आहोत. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड आणि शिरोळ या दोन मतदारसंघांत समाजाची निर्णायक मते आहेत.
या मतदारसंघात अनुक्रमे रियाज शमन आणि एम. एस. गवंडी हे दोन प्रबळ उमेदवार आहेत. या बरोबरच राज्यातील मालेगाव, धुळे, भिवंडी, भायखळा, घायरी, धाराशीव, मिरज, कसबा आणि हडपसर (पुणे), सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगर या मतदारसंघात ऑर्गनायझेशनला संधी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
पत्रकार परिषदेस कासिम मुल्ला, रियाज शमन, जहाँगीर हजरत, अमीरहमजा मीरा, समीरक राउत उपस्थित होते.