सांगली दि.१२ (प्रतिनिधी) -महाविकास आघाडीने महाराष्ट्रनाम्यात लाडक्या बहिणीला रु. ३००० , शेतकरी कर्जमुक्ती व हमीभाव, जुनी पेन्शन योजना, अडीच लाख नोकर भरती, बेरोजगार भत्ता ४०००, जातीनिहाय जनगणना व इतर अनेक लाभदायक घोषणा केल्या आहेत, असे प्रतिपादन महाविकास आघाडीचे प्रचारप्रमुख खा. चंद्रकांत हांडोरे यांनी केले. कच्छी भवनात महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते.

यावेळी बोलताना ते म्हणाले, महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे १८० ते १९० आमदार निवडून येतील, त्यामध्ये पृथ्वीराज पाटील असतील. आम्ही त्यांच्या विजयासाठी राज्यस्तरावरील महाविकास आघाडीचे नेते प्रयत्न करीत आहोत. राज्यात आमचेच सरकार येणार आहे. महाविकास आघाडीची सत्ता येताच महाराष्ट्रनाम्यात जाहीर केलेल्या घोषणांची अंमलबजावणी सुरु होईल संविधान संपवण्याचा घाट घालणाऱ्या बीजेपीला मतदान करु नका. कोणत्याही परिस्थितीत आपल्याला भाजपाला रोखावे लागेल कारण या जातीयवादी बीजेपीला संविधान बदलायचे आहे. संविधानाने दिलेले सर्व सामान्य जनतेचे अधिकार धोक्यात आले आहेत. ते वाचवण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांना निवडून दिले पाहिजे. सांगलीतील भिमशक्ती पृथ्वीराज पाटील यांच्या पाठिशी खंबीरपणे उभी आहे. खा. राहूल गांधी यांनी भारत जोडो व भारत न्याय यात्रा काढून संविधान वाचवण्याचे आवाहन केले आहे. म्हणून त्यांचे हात बळकट करण्यासाठी हात चिन्हासमोरील बटण दाबून पृथ्वीराज यांना विजयी करा. पृथ्वीराजबाबा यांच्या विजयासाठी भिमशक्तीचे कार्यकर्ते जीवाचे रान करत आहेत.

यावेळी पृथ्वीराज पाटील म्हणाले ‘डॉ. विश्वजीत कदम माझे नेते आहेत. माझ्या प्रचाराचा नारळ त्यांनी फोडला आहे. आम्ही सर्व त्यांचेच कार्यकर्ते आहोत. ज्या खासदाराला निवडून दिले ते काँग्रेस विचाराचे म्हणून सर्व समाजानी मतदान केले. भाजपाचा पराभव करण्यासाठी सर्व बहुजन समाजातील मतदारांनी तुम्हाला मतदान केलं विधानसभेला तुमची भूमिका काय आहे ? तुम्ही अपक्षाचे काम करता म्हणजे बीजेपीला मदत करत आहात असे लोक बोलत आहेत. तुम्ही माझ्या प्रचाराच्या व्यासपीठावर येऊन मला पाठिंबा जाहीर केला तरच लोकांचा विश्वास बसणार आहे. सांगलीची लढत दुरंगी लढत आहे. भाजपाचा निश्चित पराभव होईल. पाच वर्षे काम केले आता पाच वर्षे मला आमदार म्हणून निवडून सेवेची संधी द्या. खा. हांडोरे यांची भिमशक्ती माझ्या पाठीशी आहे म्हणजे विजय निश्चित आहे असा मला विश्वास आहे.

डॉ. प्रकाश पेठकर अध्यक्ष पुरोगामी दलीत संघ महाराष्ट्र प्रदेश, भिमशक्ती संघटना अध्यक्ष सिध्दार्थ माने व सांगली जिल्हा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सचिव काॅ. नंदकुमार हत्तीकर यांनी पृथ्वीराज पाटील यांना पाठिंबा दिल्याची पत्रे दिली.

यावेळी सुकुमार कांबळे, डॉ. नामदेव कस्तुरे, उत्तम कांबळे, आशिष कोरी प्रा. गायकवाड, उत्तम मोहिते यांनी पृथ्वीराज पाटील यांना निवडून आणण्याचे आवाहन केले. सिध्दार्थ माने,मयूर पाटील, मंगेश चव्हाण,मुन्ना कुरणे, उत्तम कांबळे, प्रा. एन.डी.बिरनाळे, आशिष कोरी, प्रा. गायकवाड, उत्तम मोहिते, राम कांबळे, पै. प्रकाश पेठकर, सुकुमार कांबळे, डॉ. नामदेव कस्तुरे, भारती भगत, सीमा कुलकर्णी, शुभम बनसोडे, विजय आवळे, किरण देवकुळे, रोहीत शिवशरण, श्रीकांत साठे, राहुल वायदंडे, गणेश चिकुर्डेकर, शशिकांत बनसोडे, विक्रम कांबळे व भिमशक्तीचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.