सांगली, दि.5 (प्रतिनिधी) – राज्यात पक्ष फोडणाऱ्या भाजपने सांगलीत काँग्रेस फोडण्याचा पॅटर्न राबवला आहे. सांगलीतील काँग्रेसमधील बंडखोरीचे षङयंत्र भाजपकडून गेल्या सहा महिन्यांपासून शिजवलं जात होतं. याबाबत मला प्रदेश काँग्रेसचे प्रमुख नेत्यांनी सावध केलं होतं. आमदार विश्वजीत कदम यांनी खूप ताकदीने ते टाळण्याचा प्रयत्न केला, मात्र दुर्दैवाने ते टाळता आले नाही. आता लढाई आर-पारची आहे. गेल्यावेळी भाजप बाल-बाल बचे, अशी स्थिती होती. यावेळी चून-चून के मारेंगे, असा इशारा काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांनी आज येथे दिला.
महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, आम आदमी पक्ष, शेकाप, समाजवादी पक्ष कार्यकर्त्यांची आज नियोजन बैठक कच्छी जैन भवनमध्ये झाली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, राहूल पवार, सचिन जगदाळे, अजित दुधाळ, बिपीन कदम, सनी धोतरे, अमृता चोपडे, दिलीप पाटील, सच्चिदानंद कदम, आशिष कोरी, आश्विनी देशपांडे, उज्ज्वला निकम, महावीर पाटील, बाबगोंडा पाटील, काँग्रेसचे वरिष्ठ नेते करणसिंग राठोड, शेकापचे अजित सूर्यवंशी, माजी नगरसेवक मयूर पाटील, दिलीप पाटील, रज्जाक नाईक, ताजुद्दीन शेख, विकास पाटील, शेरू सौदागर, उत्तम कांबळे, सागर घोडके, शिवसेनेचे ऋषिकेश पाटील, नितीन मिरजकर, शंभूराज काटकर, गॅब्रीयल तिवडे, सौ. विजया पृथ्वीराज पाटील, आशा पाटील, सुवर्णा पाटील, कविता बोंद्रे, सुहेल बलबंड, भारती भगत, विद्या कांबळे हे उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री. पाटील म्हणाले, ‘‘आमदार विश्वजीत कदम यांनी मला मेरीटवर उमेदवारी दिली. त्यांनी विधान परिषद द्यायची ठरले होते. तरीही त्यांनी बंडखोरी केली, याचं दुःख आहे. ही बंडखोरी रहावी, सयासाठी भाजप पक्षाकडून बेमालुम प्रयत्न सुरु होते. धूर्तपणे नियोजन केले जात होते. राज्यात पक्ष फोडणाऱ्या भाजपने सांगलीत काँग्रेस फोडण्याचा पॅटर्न राबवला. त्यांचा हा डाव जनता हाणून पाडेल. या स्थितीत आमच्या कार्यकर्त्यांवर दबाव टाकला जातोय, त्यांना दम दिला जातोय, माझी विनंती आहे, हे थांबवा. तुम्हाला भाजपला मदत करायची आहे आणि मला भाजपला पराभूत करायचे आहे. गाडगीळांना जनता कंटाळली आहे. पुढच्या पंधरा दिवसांत त्यांच्या निष्कलंक, स्वच्छ, कार्यसम्राटपणाचा बुरखा मी फाडणार आहे.’’
संजय बजाज म्हणाले, ‘‘पृथ्वीराज पाटील यांनी गेली दहा वर्षे श्रम घेतले आहेत. विरोधक कसा असावा, सरकारला रस्त्यावर उतरून जाब कसा विचारावा, हे त्यांनी दाखवून दिले. त्यांच्यासारखा तळातून तयार झालेला माणूस सांगलीचा आमदार झाला तर मतदार संघात बदल घडेल. महाविकास आघाडी संपूर्ण ताकदीने त्यांच्या सोबत आहे. राज्यात बदल घडवायचा आहे, त्याची सुरवात सांगलीतून करूया.’’
त्यांचे हे चौथे बंड
पृथ्वीराज पाटील म्हणाले, ‘‘वसंतदादा घराण्याने केलेले ही तिसरे बंड नाही. हा पार्ट थ्री नाही. त्यांचे हे चौथे बंड आहे. कारण, एकदा प्रकाशबापू पाटील यांच्या विरोधात मदनभाऊंनी बंड केले होते. ते का लपवता? सामान्य कार्यकर्ता लढायला उभा असताना पुन्हा त्याला पाडण्यासाठी बंड करताय? हे बंड मोडले तरच भविष्यात काँग्रेसमध्ये कार्यकर्ता मोठा होऊ शकेल.’’