वायनाड लोकसभा मतदारसंघातून मैदानात; काँग्रेसकडून उमेदवारीची घोषणा
नवी दिल्ली – काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी अखेर संसदीय राजकारणात पाऊल ठेवलं आहे. काँग्रेसने वायनाड लोकसभा मतदारसंघातून प्रियंका गांधी यांना मैदानात उतरले आहे. वायनाड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची निवडणूक आयोगाने घोषणा केल्यानंतर काँग्रेसने प्रियांका गांधी वाड्रा यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा केली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केरळमधील लोकसभा आणि विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सदस्यांना पक्षाचे उमेदवार म्हणून नियुक्त करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातून प्रियांका गांधी वाड्रा, केरळमधील पलक्कड विधानसभा मतदारसंघातून राहुल ममकुटाथिल आणि चेलक्क्कारा (अनुसूचित जाती) मधून रम्या हरिदास यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
केरळमधील वायनाड लोकसभा आणि विविध राज्यांतील ४७ विधानसभा जागांसाठी १३ नोव्हेंबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे. २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीत वायनाड आणि रायबरेली मतदारसंघातून विजय मिळवला होता. निवडणुकीनंतर राहुल गांधी यांनी वायनाडची जागा सोडून रायबरेलीची जागा कायम ठेवली होती. राहुल गांधी यांची बहीण आणि काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा यांना या मतदारसंघातून आता पक्षाने उमेदवारी दिली आहे. प्रियांका गांधी वाड्रा लोकसभा पोटनिवडणुकीत विजयी झाल्यास गांधी कुटुंबातील तिन्ही सदस्य पहिल्यांदाच संसदेत असतील.
राहुल गांधी यांनी वायनाडची जागा सोडल्यानंतर काँग्रेसने प्रियांका गांधी वाड्रा तेथे पोटनिवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले होते. राहुल यांनी रायबरेलीची जागा निवडली कारण हा मतदारसंघ कॉंग्रेसचा परंपरागत मतदारसंघ आहे. येथे १९७७, १९९६ आणि १९९८ वगळता सर्व लोकसभा निवडणुका काँग्रेसने जिंकल्या आहेत. राहुल गांधी यांचे आजी-आजोबा, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि फिरोज गांधी यांनीही या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. रायबरेलीमध्ये राहुल यांना आपल्या कुटुंबाचा वारसा पुढे चालवायचा आहे. यापूर्वी २००४ ते २०१९ या काळात ही जागा सोनिया गांधी यांच्याकडे होती. २०१९ मध्ये राहुल यांनी अमेठी आणि वायनाड या दोन्ही मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, पण अमेठीमध्ये त्यांचा पराभव झाला होता तर केरळमधील वायनाडमध्ये ते विजयी झाले होते.
सोनिया गांधी आता राज्यसभेच्या खासदार आहेत. प्रियांका गांधी सक्रिय राजकारणात येण्याची शक्यता असल्याने गांधी कुटुंबाला संसदेत आपला प्रभाव मजबूत करायचा आहे. शिवाय, वायनाडमध्ये प्रियांका यांच्या उपस्थितीमुळे उत्तर आणि दक्षिण या दोन्ही भागात कॉंग्रेसचे अस्तित्व दर्शविणारा धोरणात्मक संदेश जनतेत जाण्याची शक्यता आहे.