Monday, December 23, 2024
Google search engine
Homeसांगली जिल्हापृथ्वीराज पाटील यांनी माझ्या उमेदवारीची धास्ती घेतली असून तेच भाजपचे डमी उमेदवार...

पृथ्वीराज पाटील यांनी माझ्या उमेदवारीची धास्ती घेतली असून तेच भाजपचे डमी उमेदवार : जयश्रीताई पाटील

लक्ष्मी मंदिर, पार्श्वनाथनगर परिसरात श्रीमती पाटील यांचा प्रचार दौरा

सांगली, दि.६ (प्रतिनिधी) – माझ्या नावाशी साधर्म्य असलेले दोन डमी उमेदवार उभे करून पृथ्वीराज पाटील यांनी रडीचा डाव खेळला आहे. त्यांनी माझ्या उमेदवारीची धास्ती घेतली असून तेच भाजपचे डमी उमेदवार आहे, अशी टीका काँग्रेसच्या बंडखोर उमेदवार जयश्रीताई पाटील यांनी केली. शहरातील लक्ष्मी मंदिर परिसर, पार्श्वनाथनगर परिसरात श्रीमती पाटील यांनी बुधवारी प्रचार दौरा केला. यावेळी त्यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या.

यावेळी बोलताना जयश्री पाटील म्हणाल्या की, काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांनी माझ्या उमेदवारीची धास्ती घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी स्वतःच्या मेहुणीचा अर्ज भरला. माझ्या नावाशी साधर्म्य असलेले दोन उमेदवार उभे केले. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.

त्या म्हणाल्या की, काँग्रेस उमेदवाराच्या बैठकीत राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी विधानसभा निवडणुकीला भाजपला छुपी मदत कशी केली हे जाहीरपणे सांगितले. म्हणूनच सुधीर गाडगीळ आमदार होऊ शकले. स्वतःच्या पक्षाचा उमेदवाराला बदनाम करून भाजपला निवडून दिलेल्या लोकांच्या पगंतीला पृथ्वीराज पाटील बसले आहेत. त्यातून त्यांचे काय होणार, याचा विचार त्यांनी करावा. भाजपला निवडून आणण्यासाठी डमी उमेदवार उभा करण्याची प्रथा कोणी चालू केली, याचा अभ्यास पृथ्वीराज पाटील यांनी करावा. आमच्यावर षडयंत्राचा आरोप करण्याऐवजी त्यांनी आत्मपरिक्षण करावे. कदाचित तेच भाजपचे डमी उमेदवार म्हणून रिंगणात आले आहेत. वास्तविक कित्येक महिन्यापासून मी निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट केले होते. तिकीट मिळो न मिळो मी लढणार होते. मग षडयंत्र कोणी केले, तुम्ही की काँग्रेसने याचे उत्तर द्यावे. सांगलीची जनता आमच्या पाठिशी ठामपणे उभी आहे. काँग्रेस जीवंत ठेवल्याच्या बाता पृथ्वीराज पाटील मारत आहेत. मग आम्ही इतके वर्षे पक्षात काय केले? सांगलीची जनता भाजप व काँग्रेस या दोन्ही उमेदवारांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असेही त्या म्हणाल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments