सांगली दि.१४ (प्रतिनिधी) – महायुती शासन हे कायम महापुरुषांचा अपमान करते. त्यांच्या राज्यात महिलांचा अपमान होतो. भ्रष्टाचारी महायुती शासनाला जनता घरी बसवणार आणि महाआघाडीचे सरकार येणार आहे. पृथ्वीराज पाटील यांच्याकडे सांगलीच्या विकासाची दूरदृष्टी आहे. पाच वर्षे त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्यांना आमदार म्हणून निवडून द्या. ते निश्चितच चांगली कामगिरी करतील असा माझा विश्वास आहे. कर्नाळ गाव हे काँग्रेसप्रेमी आहे. या गावच्या विकासात पृथ्वीराज यांचे योगदान चांगले आहे असे असे प्रतिपादन आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. पृथ्वीराजबाबा पाटील यांच्या कर्नाळ येथील प्रचारसभेत ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले, पृथ्वीराज पाटील यांच्या पाच वर्षाच्या कामाचा अहवाल पाहूनच त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सांगलीच्या समस्या काय आहेत आणि त्या सोडवण्यासाठी काय केलं पाहिजे. भविष्यात सांगली कशी असावी याबाबत त्यांनी वैयक्तिक जाहीरनामा तयार केला आहे त्याप्रमाणे ते निश्चितच सांगलीचा विकास करु शकतात. महायुती शासन हे धर्मांध आहे. जाती पातीत भांडणे लावून फूट पाडणाऱ्या या अकार्यक्षम सरकारला गाडण्याची हीच वेळ आहे. राज्यातील जनता या सरकारला कंटाळली आहे. २० नोव्हेंबरला हात चिन्हासमोरील बटण दाबून पृथ्वीराज पाटील यांना भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी पृथ्वीराज म्हणाले, कर्नाळकरांनी मला गेल्या निवडणुकीत भरघोस मतदान केले आहे. थोडक्यात माझा पराभव झाला. तथापि मी दुसऱ्या दिवसापासून काम सुरु केले. कर्नाळसाठी रिंगरोडला सव्वा कोटी आणि अंबरसो दर्ग्यासाठी सात लाखाचा निधी महाआघाडी सरकार असताना आमदार बाळासाहेब थोरात यांनी या भागाच्या विकासासाठी दिला.नगरविकास खात्याकडून दहा कोटीचा निधी आणून अनेक कामे करता आली. मी जी जी कामे घेऊन गेलो ती सर्व थोरात साहेबांनी करुन दिली आहेत.या कामी आमदार डॉ. विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली काम करताना त्यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाख मोलाचे आहे. कोरोना आणि महापूर काळात मी केलेली मदत सांगलीकर विसरणार नाहीत. मी प्रामाणिकपणे पडत्या काळात सांगलीत काँग्रेस जिवंत ठेवली. श्रीराम मंदीर प्रतिकृती आणि नवरात्रोत्सव हे उपक्रम राबवले. खोतवाडीचा पूल उभा केला. सिव्हिलसाठी ५०० बेडचे हाॅस्पिटल निधीसह मंजूर करून घेतला. परंतु त्याचे श्रेय मला मिळेल म्हणून आमदार गाडगीळ यांनी ते होऊ दिले नाही. अशा कोत्या मनाच्या व अकार्यक्षम आमदाराला आता घरी बसवा. अपक्ष उमेदवाराला माझ्यासह पक्षाचे राष्ट्रीय व प्रदेशातील नेत्यांनी विनंती केली. पण त्यांनी उमेदवारी ठेवून भाजपाला मदत केली आहे असे आता लोकच बोलतात. अपक्षाला मत म्हणजे भाजपाला मत आहे. माझ्या हात चिन्हासमोरील बटण दाबून भरघोस मतांनी मला निवडून द्या. मतदार संघातील शहरी व ग्रामीण भागातील जनतेच्या समस्यांचा संवाद सांगलीसाठी उपक्रमांतर्गत अभ्यास करून त्या सोडवण्यासाठी व भविष्यात सांगली कशी असावी याबाबत जनतेच्या सूचना घेऊन वैयक्तिक जाहिरनामा तयार केला आहे. त्यासाठी मला पाच वर्षे आमदार म्हणून संधी द्या.आमदार कसा असावा हे सिध्द करुन दाखवेन.
स्वागत व प्रास्ताविक विक्रम कदम तर नासीर चौगुले यांनी आभार मानले. यावेळी सरपंच संध्या कांबळे, उपसरपंच नसीम चौगुले, युवराज पाटील, नासीर चौगुले, राष्ट्रवादीचे राजू पाटील, गणेश घोरपडे, रघुनाथ घोरपडे, महावीर पाटील नांद्रे, ग्रामपंचायत सदस्य आदिती कदम व सुनिता नरळे, प्रा. नझीर चौगुले सर, कुणाल माने, वैभव बंडगर व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व कर्नाळ, बिसूर, वाजेगाव, खोतवाडी व नांद्रे गावातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.