कोल्हापूर : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून आचारसंहिता देखील सुरू आहे. ठिकठिकाणी निवडणूक आयोगाची भरारी पथके तैनात असून प्रत्येक गाडी आणि पार्ट्यांवर पोलिसांची करडी नजर आहे. अशातच बुधवारी रात्री उशिरा गगनबावडा तालुक्यातील कोदे बुद्रुक पैकी आंबेवाडी येथे बेकायदेशीर सुरू असलेल्या पार्टीवर कोल्हापूर पोलिसांनी छापा टाकत ९ नृत्यांगनांसह ३१ जणांना ताब्यात घेतलं. यात मद्य, मोबाईल फोन व इतर साहित्य असा तब्बल ४ लाख ५१ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय.
मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापुरातील गगनबावडा तालुक्यातील कोदे बुद्रुक पैकी आंबेवाडी येथील बुधवारी (दि. ३०) रात्री नयनील फार्म रिसॉर्टमध्ये नृत्यांगनासोबत काही तरुण बेकायदेशीर पार्टी करत असल्याची माहिती मिळाली. अधिक तपास करताना उपविभागीय पोलिस अधिकारी शाहूवाडी विभाग व गगनबावडा पोलिसांच्या संयुक्त पथकाने या पार्टीवर रात्री नऊच्या सुमारास छापा टाकला. यावेळी छाप्यात ९ नृत्यांगनांसह एकूण ३१ जण मद्यधुंद अवस्थेत तोकडे कपड्यातील, अश्लील आणि बिभत्स हावभाव करणाऱ्या नृत्यांगणा, विगरपरवाना दारूचे सेवन करणारे आणि मद्याच्या बाटल्या निदर्शनास आले. यानंतर सर्वांना ताब्यात घेत ९ नृत्यांगनांसह एकूण ३१ जणांवर गगनबावडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखला करण्यात आलाय. तसेच पार्टीसाठी आणण्यात आलेला मद्य, मोबाईल फोन व इतर साहित्य असा तब्बल ४ लाख ५१ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
ही कारवाई पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री जाधव, उपविभागिय पोलिस अधिकारी आप्पासो पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गगनबावडा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानदेव वाघ, पो. ना. श्रीकांत मामलेकर, पो. हे. कॉ. मानसिग सातपुते, संदीप पाटील, सागर पाटील, पो. कॉ. दिगंबर पाटील, अशोक पाटील, अमोल तेली यांनी कारवाई ही केली.दरम्यान, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस अॅक्शन मोडवर आले आहेत. पश्चिम महाराष्ट्र तसेच उत्तर महाराष्ट्रात देखील करोडोंची रक्कम जप्त करण्यात आली आहे.