सांगली, दि.९ (प्रतिनिधी) – राजकीय क्षेत्रात महाराष्ट्र देशाचा आदर्श होता.. आज ही राज्याची प्रतिमा भाजपा महायुती शासनाने मलिन केली आहे. झूट म्हणजे खोटे, फूट म्हणजे जनतेने नाकारले तरी साम दाम दंड नीतीचा वापर करुन खासदार आमदार फोडून सत्ता ताब्यात घेणे आणि देशाच्या संपत्तीची म्हणजेच जनतेच्या पैशाची लूट करणारे केंदात आणि महाराष्ट्रात जनविरोधी सरकारे आहेत. महागाईच्या आगडोंबात सामान्य माणूस होरपळून निघत आहे. अन्नदाता शेतकऱ्यांना हमीभाव मागतात म्हणून ट्रॅक्टरखाली चिरडून मारले जाते..महिला आणि अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला जातो आणि आरोपींना पाठिशी घातलं जातं.. बेरोजगारी प्रचंड वाढली आहे.. युवा वर्ग दिशाहीन आणि भयभीत झाला आहे.. महाराष्ट्रात भाकरीपेक्षा जातीपातीचे राजकारण करुन लोकांमध्ये फूट पाडणे, लोकांना खोटी आश्वासने देणे आणि आमदारांना खोकी देऊन घटनात्मक मार्गाने सत्तेवर आलेले सरकार पाडण्याचे पाप या महायुती शासनाने केले आहे. आपल्या मतातून या महायुती शासनाचा पराभव करा. आणि महाआघाडीचे शासन सत्तेवर बसवा. भारतीय संविधानाची मोडतोड करण्याचे प्रकार देशाला घातक आहेत.राहूल गांधी यांनी नफरत छोडो भारत जोडो अभियान सुरू करुन भारत मजबूत करण्याचे पाऊल उचलले आहे. काँग्रेस आणि राहूल गांधी यांचा मानवतावादी विचार सांगलीत पृथ्वीराज पाटील बळकट करत आहेत. त्यांना आमदार करा आणि त्यांचा उपयोग सांगली अधिक चांगली करण्यासाठी करा. असे प्रतिपादन निवडणूक विश्लेषक, राहूल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचे समन्वयक आणि स्वराज्य अभियान संघटनेचे योगेंद्र यादव यांनी केले.
सांगली विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या जाहीर प्रचार शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले, ‘सांगली विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज पाटील हे सर्व सामान्य जनतेच्या हितासाठी काम करतात., गेली दहा वर्षे ते सांगलीकरांच्या सेवेत आहेत.ते अथकपणे लोकसेवा करतात. स्वातंत्र्य व लोकशाही वाचवण्यासाठी आणि धर्मनिरपेक्ष पुरोगामी विचार जपण्यासाठी त्यांची धडपड असते. त्यांना भरघोस मतांनी निवडून द्या.
यावेळी आमदार डॉ. विश्वजीत कदम, महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज पाटील, काँग्रेसचे निरीक्षक आमदार बी. आर. पाटील, सुखदेवसिंग, प्रमोद सुर्यवंशी, संजय बजाज, शंभूराज काटकर, सचिन जगदाळे, अभिजित भोसले, हरीदास पाटील, मंगेश चव्हाण, दिलीप पाटील, रज्जाक नाईक,बिपीन कदम, आयुब बारगीर, प्रा. एन.डी.बिरनाळे, विक्रम कांबळे, आशिष कोरी, नितीन मिरजकर,शेरुभाई सौदागर, अजिज मेस्त्री, चंदन चव्हाण, मुन्ना कुरणे, सच्चिदानंद कदम, विजया पृथ्वीराज पाटील, ज्योती आदाटे,आशा पाटील, संगिता हारगे, उत्तम कांबळे, सिध्दार्थ माने व महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.