शिरोळ विधानसभेसाठी महाविकास आघाडी कडून उद्यानपंडित गणपतराव पाटील यांच्या उमेदवारीमुळे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांत नवचैतन्य निर्माण झाले आहे. 2014 साली सा. रे. पाटील साहेबांनी काँग्रेसच्या ‘हात’ या चिन्हावर विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यानंतर तब्बल दहा वर्षानंतर काँग्रेसच्या उमेदवाराला संधी मिळाल्याने कार्यकर्त्यांमधील मरगळ दूर झाली आहे. श्री दत्त महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिरोळ तालुक्यात काँग्रेसला उर्जितावस्था आणण्यासाठी ‘गणपती’ पावणार अशी सकारात्मक चर्चा जोर धरू लागली आहे. उद्यानपंडित गणपतराव पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना झालेली कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी पाहता काँग्रेस पक्षाचे ‘हात’ बळकट होण्यास हातभार लागणार आहे.
2014 साली सा. रे. पाटील साहेबांनी हात या चिन्हावर निडवून निवडणूक लढवली, मात्र त्यांना त्यात अपयश आले. 2019 साली काँग्रेसला निवडणूक लढवण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे काँग्रेसला गेल्या दहा वर्षापासून प्रतीक्षा करावी लागली आहे. सा. रे. पाटील साहेबांच्या निधनानंतर काँग्रेसकडून तितक्या ताकतीचे नेतृत्व पुन्हा तालुक्यात ‘उभारी घेईल का?’ अशा शंका कुशंका उपस्थित केल्या जात होत्या. मात्र उद्यानपंडित गणपतराव पाटील दादा यांनी काँग्रेसला एक सक्षम नेतृत्व देण्याची भूमिका घेऊन वाटचाल केली. साहेबांची उणीव जाणवत असली तरी आपल्या प्रेमळ, अभ्यासू, दूरदृष्टीपणा, कर्तव्यनिष्ठ आणि सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याच्या दादांच्या भूमिकेमुळे काँग्रेस पक्षातील एकेक कार्यकर्त्यांचा ‘हात’ पुन्हा जोडला गेला. कार्यकर्त्यांना पक्षात एका ‘कट्टर आणि निष्ठावंत’ धाग्यात गुंफण्याचे मोठे काम दादांनी सुरू ठेवले. यामुळे या दहा वर्षात आमदारकी किंवा दुसरे कोणते मोठे पद नसतानाही काँग्रेस कार्यकर्ते पक्षाशी बांधिल राहिले. कार्यकर्त्यांचे जाळे अबाधित राहिले.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अपयश आले तरी कार्यकर्ते काही प्रमाणात पुन्हा ‘चार्ज’ होण्यामध्ये दादा यशस्वी ठरले. महायुती सरकारच्या विरोधात मोर्चे, आंदोलने यात सहभागी होऊन दादांनी कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्याचे काम अखंडित सुरु ठेवले. कार्यकर्ता शिबिर घेणे असो वा शेती, रोजगार, कला, शिक्षण, समुपदेशन, स्पर्धा, कोरोना काळ, पूर परिस्थिती अशा विविध प्रसंगांमध्ये आणि विविध माध्यमातून दादांनी सहकार्य करीत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सतत पक्षाशी आणि स्वर्गीय सा. रे. पाटील साहेबांच्या विचारांशी बांधून ठेवले. त्यामुळे श्री दत्त उद्योग समूह, स्वर्गीय सा. रे. पाटील साहेब आणि दादांच्या भोवतीचे आकर्षण आणि वलय कायम राहिले.
श्री दत्त साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने दादांनी पुन्हा एकदा शिरोळ तालुका आणि कार्यक्षेत्रातील सभासदांशी प्रत्यक्ष भेटीचा सिलसिला सुरू करून सुसंवाद घडवून आणला. गावे आणि गावे पुन्हा एकदा जोडली. शेतकरी आणि सभासदांमध्ये चैतन निर्माण केले आणि दत्त कारखान्यावर एक हाती सत्ता आणण्यात त्यांनी बाजी मारली.
लोकसभा निवडणुकीवेळी महाविकास आघाडीने ठाकरे गटाच्या सत्यजित पाटील सरूडकर यांना उमेदवारी दिली. त्यांच्या प्रचारामध्ये अग्रेसर राहून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सक्रिय सहभाग घेण्यास लावून पक्षनिष्ठा काय असते ? याचा प्रत्यय आणून दिला. काँग्रेस कार्यकर्त्यांनीही ‘दादा सांगतील ती पूर्व दिशा’ म्हणून महाविकास आघाडीचा प्रामाणिकपणे प्रचार केला. आघाडी धर्म पाळले. मैत्री कशी टिकवायचे असते? पक्षनिष्ठा कशी जपायचे असते? हे दादांनी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या जोरावर दाखवून दिले
त्यांच्या या पक्ष निष्ठेची दखल घेऊन महाविकास आघाडी मधील सर्वच नेत्यांनी आमदारकीसाठी दादांच्या नावावर शिकामोर्तब करून पुन्हा एकदा तालुक्याच्या सर्वांगीण विकासाला बळ देण्याची भूमिका घेतली आहे. दादांच्या या उमेदवारीमुळे गेल्या दहा वर्षातील काँग्रेस पक्षाचा संघर्ष आणि टिकून राहण्याच्या क्षमतेला दाद मिळाली आहे. काँग्रेसचे सर्वच लहान-मोठे पदाधिकारी, कार्यकर्ते ‘रिचार्ज’ होऊन ‘यंदा गुलाल उधळायचाच!’ ही सकारात्मक दृष्टी ठेवून कामाला लागले आहेत. सर्वच कार्यकर्त्यांनी ही निवडणूक आपल्या हातात घेऊन दादांच्या पाठीमागे खंबीरपणे राहण्याची भूमिका ठेवली आहे. दादांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वच विचारसरणीच्या लोकांकडूनही त्यांना मोठे पाठबळ मिळण्यास सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांच्या मनात विजयाची ‘मशाल’ पेटली असून सर्वजण हातात ‘हात’ घेऊन ‘तुतारी’ फुंकणारच याची खात्री वाटते. शिरोळ तालुका हा नेहमीच परिवर्तन घडवून आणणारा तालुका म्हणून ओळखला जातो. दादांच्या शिरोळ तालुक्याच्या सर्वांगीण विकासाच्या स्वप्नाला ‘विजयाचा गुलाल’ नक्की लागणार अशी खात्री कार्यकर्त्यांच्या मधून आणि शिरोळ तालुक्यातील जनतेमधून दिली जात आहे.