सांगली, दि. 20, (जि. मा. का.) : भारतरत्न एम. विश्वेश्वरय्या यांची जयंती अभियंता दिन म्हणून देशभर साजरी केली जाते. अभियंता दिनाचे औचित्य साधून सार्वजनिक बांधकाम विभाग मिरज व सार्वजनिक बांधकाम (पश्चिम) विभाग सांगली यांच्या वतीने सर्किट हाऊस सांगली येथे रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, कर्मचारी व ठेकेदार अशा 100 पेक्षा जास्त रक्तदात्यांनी या शिबिरात रक्तदान केले.
सार्वजनिक बांधकाम विभाग मिरजचे कार्यकारी अभियंता क्रांतीकुमार मिरजकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, उपअभियंता अविनाश पोळ, श्रीमती करवीर, श्री. हुद्दार, श्री. मोहिते व इतर अधिकारी व कर्मचारी यांनी रक्तदान शिबीर यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.
सांगली जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत असणारे सांगली, मिरज, जत, कवठेमहांकाळ, तासगाव, आटपाडी, विटा, पलूस कडेगाव, इस्लामपूर, शिराळा उपविभागाचे उपअभियंता, कर्मचारी व ठेकेदार यांनी सहभाग नोंदविला. रक्तदानासाठी पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालय रक्तपेढीने नियोजन केले. सर्व रक्तदात्यांना कार्यकारी अभियंता क्रांतीकुमार मिरजकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र व गुलाबपुष्प देवून सन्मानित करण्यात आले. रक्तदान शिबीर आयोजित करण्यात सहभागी पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालय रक्तपेढी यांच्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांचे आभार मानले.