सांगली (प्रतिनिधी) – सांगली विधानसभेचे भाजप महायुतीचे उमेदवार आमदार सुधीर गाडगीळ यांनी शुक्रवारी झंझावाती प्रचाराला सुरुवात केली. त्यांनी सांगली शहरातील वृत्तपत्र विक्रेत, खेळाडूंची भेट घेतली. आमराई आणि बापटमळा येथे मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांशी संवाद साधला. तर काहीठिकाणी चाय पे चर्चा केली.
सांगली विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर भाजपचे उमेदवार सुधीरदादा गाडगीळ यांनी शुक्रवारी पहाटेपासूनच आपल्या प्रचाराची सुरूवात केली. शहरातील वृत्तपत्र विक्रेत्यांच्या केंद्राला गाडगीळ यांनी भेट दिली. वृत्तपत्र विक्रेते संघटनेचे राज्य सरचिटणीस विकास सूर्यवंशी, जिल्हा कार्याध्यक्ष दरीबा बंडगर यांनी त्यांचे स्वागत केले. विक्रेत्यांसाठी महायुती सरकारने महामंडळ स्थापन केल्याबद्दल वृत्तपत्र विक्रेत्यांनी गाडगीळ यांचे आभार मानले. त्यानंतर आमराईमध्ये गाडगीळ यांनी सकाळीच नागरिकांची भेट घेऊन चर्चा केली. छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथील खेळाडू यांच्याशी चर्चा करून मैदानाबाबत समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांच्यासोबत भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार उपस्थित होते.
दरम्यान, सांगली महापालिकेच्या औषध फवारणी विभागाला त्यांनी भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला. त्यावेळी महापालिकेच्या औषध फवारणी विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी शहरातील योगासन वर्गाला भेट देऊन आमराई, बापट मळा येथे मॉर्निंग वॉकसाठी आलेले ज्येष्ठ नागरिक यांच्याशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला.