सांगली : शहरातील कृष्णा नदीच्या काठावरील आयर्विन पुलाजवळ पतीकडूनच पत्नीवर कोयत्याने मानेवर सपासपा हल्ला करून खून करण्यात आला आहे. रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली . पुलाच्या पाणी पातळीचे मोजमाप कोरलेल्या पिलर च्या जवळच हा प्रकार घडला आहे. खून झालेल्या महिलेचे नाव सौ.प्रियांका जाकाप्पा चव्हाण( वय 28,रा. सांगलीवाडी) असे आहे.
या खुनाची माहिती समजतात तात्काळ सांगली शहर विभागाच्या पोलीस उपाधीक्षक एम. विमला, पोलीस निरीक्षक संजय मोरे घटनास्थळी दाखल झाले. त्यानी तात्काळ या खुनाची गंभीरता पाहून संशियताचा शोध घेण्यास सांगितले.
याबाबत अधिक माहिती अशी की, रात्री नऊ वाजता सुमारास मयत प्रियांका आणि तिचा नवरा जाकाप्पा दोघेजण कृष्णा नदीच्या सरकारी घाटावर आले होते. त्यानंतर काही वेळाने ते आयर्विन पुलाच्या बाजूला निघून गेले. त्यावेळी जकाप्पा कडून प्रियांकावर कोयत्याने सपसाप हल्ला करण्यात आला. या हल्ल्यावेळी प्रियांकाने जोरदार आरडा ओरडा केला. त्यामुळे घाटाजवळ बसलेले काहीजण पुलाजवळ पळत गेले. त्यावेळी हा प्रकार लक्षात आला. त्यांनी तात्काळ याची माहिती सांगली शहर पोलीस ठाण्यात दिली. सांगली शहर पोलिसांनी या ठिकाणी येऊन पाहणी केली त्यावेळी प्रियांका ही मयत अवस्थेत पडलेली दिसून आली. हा मृतदेह वसंतदादा सर्वोपचार रुग्णालयात पाठवण्यात आला. आजूबाजूच्या लोकांच्या कडून माहिती घेतली असता तिच्या नवऱ्याने तिचा खून केलाय, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तात्काळ याची तपास चक्र सुरू केली. प्रियांका वर हल्ला केल्यानंतर संशयित अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. हा खून पतीनेच केल्याचा संशय आल्याने पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.