सांगली, दि.२८ (प्रतिनिधी) – कार्वे (ता. खानापूर) औद्योगिक वसाहतीत असलेल्या रामकृष्ण हरी माऊली इंडस्ट्रीजवर छापा टाकून २९ कोटी ७३ लाख ५५ हजार २०० रूपयांचे एमडी ड्रग्ज व त्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले. याप्रकरणी रहुदिप धानजी बोरिया (४१, उत्तीयादरा कोसंबा, जि. सुरत, गुजरात राज्य), सुलेमान जोहर शेख (३२, मुंबई), बलराज अमर कातारी (२४, साळसिंगे रोड, विटा) या संशयित आरोपींना ताब्यात घेऊन अटक केल्याची माहिती पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी आज विटा येथे पत्रकार परिषदेत दिली.
दरम्यान, तीन संशयितांना विटा न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी त्यांना १ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीचा आदेश दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
सदरची कारवाई सोमवारी रात्री पावणे आठच्या सुमारास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगलीच्या पथकाने केली. याबाबत पोलिस सागर गिरीजापती टिंगरे यांनी विटा पोलिसांत फिर्याद दिली.
कार्वे ता. विटा येथील कारखान्यावर घातलेल्या छाप्याची अधिक माहिती देताना पोलिस अधीक्षक घुगे म्हणाले, गेल्या आठवड्यात मिरजेतील महात्मा गांधी पोलिस ठाणे व एल.सी.बी ने नशील्या इंजेक्शनचा मोठा साठा जप्त केला होता. यातील सहभागी आरोपींना अटक केली होती महात्मा गांधी पोलिसांनी आतापर्यंत १२ जणांच्या मुसक्या आवळल्या. पश्चिम महाराष्ट्रातील हे रॅकेट उघडकीस आले. त्यानंतर एलसीबीच्या पथकाने विटा तालुक्यात ही मोठी कारवाई करत नशाबाजाराला मोठा दणका दिला आहे. पुढील टप्प्यात ही कारवाई आणखी व्यापक प्रमाणावर करण्यात येईल, असेही अधीक्षक घुगे यांनी सांगितले.
विटा-सांगली रस्त्यालगत असणाऱ्या औद्योगिक वसाहतीत कच्च्या साहित्यांच्या सहाय्याने मशिनद्वारे मेफॉड्रॉन (एमडी) तयार केले जात असल्याची माहिती सांगलीच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेला मिळाली, त्यानुसार पोलिस निरीक्षक सतिश शिंदे यांनी त्यांच्या टीमसह सोमवारी रात्री रामकृष्ण हरी माऊली इंडस्ट्रीजमध्ये मेफॉड्रॉन (एमडी) तयार केले जात असलेल्या ठिकाणी छापा टाकला. त्यात २९ कोटी ७३ हजार ५५ हजार २०० रूपयांचे तयार एम. डी. ताब्यात घेतले असे सांगून जिल्हा पोलीस अधीक्षक घुगे म्हणाले, या प्रकरणी संशयित रहुदिप धानजी बोरिया (वय ४१, उत्तीयादरा कोसंबा, जि. सुरत, गुजरात राज्य), सुलेमान जोहर शेख ( वय ३२, मुंबई), बलराज अमर कातारी (वय २४, साळसिंगे रोड, विटा) यांना ताब्यात घेतले आहे. यातील संशयित रहुदिप बोरिचा हा रेकॉर्डवरील आरोपी असून त्याचे बीएससी केमेस्ट्री शिक्षण झाले आहे. त्यास केमीकल प्रॉडक्शन बाबत चांगली माहिती आहे. गेल्या एक महिन्यापासून रहुदिप बोरिचा, बलराज कातारी व सुलेमान शेख यांनी कार्वे (ता. खानापूर) गावच्या हद्दीत असलेल्या विटा येथील एकाचा प्लॉट नंबर ४३ मधील कारखाना ३० हजार रुपये प्रति महिना भाडयाने घेतला आहे. त्याबाबत त्यांच्यात अद्याप कोणताही करार झाला नाही. त्या ठिकाणी रहुदिप बोरिचा व सुलेमान शेख तेथे असणाऱ्या कच्च्या साहित्यांच्या सहाय्याने मशिनद्वारे मेफॉड्रॉन (एमडी) माल तयार करीत होते. तो माल विक्रीकरीता बलराज कातारी हा बाहेर घेऊन जात असल्याची माहिती मिळाली होती. वरील तीन संशयितांना पथकाने मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे. या गुन्ह्याचे धागेदोरे शोधण्याचे काम सद्या सुरू आहे. यामध्ये अजून आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे.
नशेबाजीला चाप लावणारी ही मोठी कारवाई झाली आहे. ही कारवाई विशेष पोलास महानिरीक्षक सुनिल फुलारी, पोलिस अधीक्षक संदीप घुगे, यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेषणचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे, धनंजय फडतरे, पंकज पवार, सिकंदर वर्धन, अच्युत सुर्यवंशी, सागर टिंगरे, संदीप गुरव, अमोल पैदाळे, नागेश खरात, मच्छिंद्र बर्डे, दरीबा बंडगर, सागर लवटे, अनिल कोळेकर, उदय साळुंखे, इम्रान मुल्ला, नागेश कांबळे, संजय पाटील, अमर नरळे, सतिश माने, महादेव नागणे, संदीप नलवडे, उदय माळी, अनंत कुडाळकर, विक्रम खोत, प्रमोद साखरपे, सुनिल जाधव, गणेश शिंदे यांनी केली.