मिरज (प्रतिनिधी) – मिरज रेल्वे जंक्शन मॉडेल स्टेशनची घोषणा होऊन सुद्धा मिरज जंक्शनचा विकास प्रलंबित आहे. म्हणून मिरज जंक्शनच्या विकासासाठी पुढाकार घेण्याची मागणी मिरज सुधार समितीने केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याकडे केली आहे. यावेळी रिपब्लिकन पक्षाच्या युवक आघाडी अध्यक्ष श्वेत कांबळे, नानासाहेब वाघमारे उपस्थित होते.
रविवारी केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना मिरजेत मिरज सुधार समितीचे ऍड. ए. ए. काझी, अध्यक्ष राकेश तामगावे, संतोष जेडगे, असिफ निपाणीकर, जहिर मुजावर, अभिजित दाणेकर, तौफिक देवगिरी आदी सदस्यांनी त्यांची भेट घेत निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे, मिरज रेल्वे जंक्शन महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील महत्त्वाचे जंक्शन आहे. अनेक वेळा मॉडेल स्टेशनची घोषणा झाली. मात्र, त्याची अंमलबजावणी आज अखेर झाली नाही. कोल्हापूर, बेळगाव, हुबळी आदी रेल्वे स्टेशनचा विकास झाला. मग, मिरज जंक्शनबाबत आकस का? असा प्रश्न मिरजकरांना पडला आहे. त्यामुळे मोदी सरकारच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी आहे. म्हणून मिरज जंक्शनच्या विकासासाठी आपण पुढाकार घ्यावा, असे साकडे मिरज सुधार समितीने केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना घातले आहे.