सांगली, दि.१६ (प्रतिनिधी) – गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशभर भारतीय जनता पक्षाच्या वतीने सभासद नोंदणी अभियान मोठ्या प्रमाणावर राबवले जात आहे. त्याच अनुषंगाने रविवार दिनांक १६ फेब्रुवारी रोजी कोल्हापूर येथे भारतीय जनता पक्षाची पश्चिम महाराष्ट्र विभागीय बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, उच्च शिक्षण मंत्री व सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांच्यासह पश्चिम महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाचे नेते हजर होते.
यावेळी पश्चिम महाराष्ट्रातील या अभियानाचा आढावा घेतला गेला. पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली शहर जिल्हा हा सभासद नोंदणी मध्ये प्रथम क्रमांकावर असल्यामुळे, चंद्रशेखर बावनकुळे व रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते सांगली शहर जिल्हाध्यक्ष श्री प्रकाश ढंग व शहर जिल्हा अभियान संपर्कप्रमुख विश्वजीत पाटील यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.
सांगली विधानसभा मतदारसंघ सभासद नोंदणी पश्चिम महाराष्ट्रात चौथ्या क्रमांकावर आहे. सांगली शहर जिल्ह्याला एक लाख 24 हजार सभासद नोंदणीचे उद्दिष्ट असून आत्तापर्यंत एक लाख 14 हजारावर सभासद नोंदणी झालेली आहे. यामध्ये सांगली विधानसभा ६२००७, तर मिरज मिरज विधानसभा क्षेत्रात ५२३०० इतकी सभासद नोंदणी झाली आहे. या नोंदणी बद्दल चंद्रशेखर बावनकुळे व रवींद्र चव्हाण यांनी आमदार सुधीर दादा गाडगीळ आमदार सुरेश भाऊ खाडे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग सरचिटणीस विश्वजीत पाटील व मोहन वाटवे यांच्यासह या अभियानात सक्रिय भाग घेतलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे विशेष अभिनंदन केले असल्याची माहिती भाजप प्रसिद्धीप्रमुख केदार खाडिलकर यांनी दिली.