Monday, July 7, 2025
Google search engine
Homeसांगली जिल्हापृथ्वीराज तुम्ही काँग्रेसमध्ये आहात का?

पृथ्वीराज तुम्ही काँग्रेसमध्ये आहात का?

माजी महापौर किशोर शहा यांचा सवाल; आत्मनिष्ठा तपासण्याचाही सल्ला

सांगली | प्रतिनिधी 

सांगली विधानसभा निवडणुकीत जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री मदन पाटील यांनी काँग्रेस उमेदवाराविरोधात निवडणूक लढवली होती. म्हणून त्यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित केले होते. त्यांना पुन्हा काँग्रेस पक्षात घेऊ नये, अशी भूमिका काँग्रेस शहर अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी मुंबईतील बैठकीत काँग्रेसचे नूतन प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासमोर मांडली होती. पृथ्वीराज पाटील यांच्या या भूमिकेला सांगली महानगरपालिकेचे माजी महापौर किशोर शाह यांनी खरमरीत उत्तर दिले आहे.

किशोर शाह म्हणाले, पृथ्वीराज तुम्हाला काँग्रेसची लागलेली काळजी बघून मनाला आनंद वाटला. कालच्या वृत्तपत्रातून मुंबई येथे नूतन प्रदेशाध्यक्ष यांनी राज्यातील सगळ्या जिल्हाध्यक्षांची जी मीटिंग आयोजित केली होती, त्यांच्यासमोर तुम्ही स्वतःचे चांगले मार्केटिंग केलं. त्यामध्ये आपण सांगली विधानसभा मतदारसंघातील बंडखोर उमेदवारांना परत काँग्रेसमध्ये घेऊ नका असे ठणकावून सांगितले. अशा आशयाच्या बातम्या वाचल्या त्या बातम्या वाचून हसावे का रडावे हेच कळत नाही. मागील राज्यातील गेल्या तीन वर्षापासून सत्तेत असलेल्या महायुती सरकारचा अजेंडा सांगली विधानसभा मतदारसंघात कुणी राबवला ही सुज्ञ जनता जाणून आहे. मग राम मंदिर चा विषय असेल, लोकसभेच्या निवडणुकीतील विषय असेल किंवा नुकत्याच झालेल्या जतच्या आमदारांना आपल्या घरी रात्रीचे स्नेहभोजन असेल. स्नेहभोजनाच्या बातम्या या कालच्या वृत्तपत्रातील आलेल्या बातम्या सारख्या प्रसिद्धीस बघायला मिळाल्या नाहीत. या कार्यक्रमांचे फोटो प्रसिद्ध झाले नाहीत. पण याच्या क्लिप्स व्हायरल झाल्या तसेच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे साताऱ्याचे एक मंत्री आपले नातेवाईक आहेत असे सांगून मंत्रालयात आपला काय उद्योग चालतो हे आम्हाला माहिती आहे. फक्त आम्ही बोलत नाही याचा अर्थ आम्ही गप्प आहे असे समजू नका. मग तुम्ही काँग्रेस प्रेमी आहात याबद्दल शंका वाटते. सलग दोन वेळा वशीला लावून, लांडी लबाडी करून, प्रदेश काँग्रेस व राष्ट्रीय काँग्रेस मधील नेत्यांची खुश-मस्करी करून विधानसभेची उमेदवारी मिळवली. मात्र सांगली विधानसभा मतदारसंघातील सुज्ञ जनतेने आपणाला सलग दोन वेळा नाकारले आहे याचे आत्मपरीक्षण आपण करणार आहात की नाही. गेली दहा वर्षे झाली आपण शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आहात आपण किती कार्यकर्ते तयार केले, आपण किती नगरसेवक निवडून आणले याचे आत्मपरीक्षण आपण कधी करणार आहात. नाचता येईना अंगाने वाकडे अशी आपली अवस्था आहे. आपणाला मिळालेली मते ही काँग्रेसची आहेत, आम्ही निवडणुकीत याचा अनुभव घेतला आहे. आणि आपण आमची माप काढता. आपणाला कोणी सांगितले बंडखोर उमेदवार काँग्रेस मध्ये निलंबन मागे घ्या म्हणून लागले आहेत याचा खुलासा आपण करावा. आम्ही कोण आहोत हे आपल्याला माहित नाही काय? बंद दरवाजा फोडून जाणाऱ्या नेत्याचे आम्ही कार्यकर्ते आहोत, याद राखा बंडखोर उमेदवारांच्या बाबतीत विनाकारण बदनामी करण्याचा प्रयत्न येथून पुढे खपवून घेतला जाणार नाही याची जाणीव ठेवावी. अन्यथा जशास तसे उत्तर देण्याला बंडखोर उमेदवारांचे कार्यकर्ते सक्षम आहेत.

स्वतःच्या संस्था वाचविण्यासाठी राज्यातील महायुती सरकारची चाटूगिरी करणाऱ्या बाबांनी दुसऱ्याची काळजी करू नये स्वतःची निष्ठा तपासावी आणि मग बेताल वक्तव्य करावे. तुम्हीच आता शहर जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन, एखाद्या सामान्य काँग्रेस कार्यकर्त्याला शहर जिल्हाध्यक्ष पदाची संधी द्यावी. बघू तुमच्यातील काँग्रेस प्रेम व निष्ठा किती आहे, असा टोलाही किशोर शाह यांनी लगावला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments