जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना त्याची फार मोठी किंमत मोजावी लागली आहे. भारतानं बदला घेत पाकिस्तानवर एअर स्ट्राइक केला. पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हवाई हल्ले करत ते उद्ध्वस्त केले आहेत. आतापर्यंत या हल्ल्यात १०० हून अधिक दहशतवादी ठार झाल्याची माहिती आहे. हे ऑपरेशन सिंदूर कसे राबवण्यात आले, आतापर्यंत काय काय झाले, याबाबतची माहिती भारताकडून दोन महिला अधिकाऱ्यांनी दिली. कर्नल सोफिया कुरेशी आणि हवाई दलाच्या विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी पत्रकार परिषदेत हवाई हल्ल्याबाबत माहिती दिली. त्यांच्यासोबत भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री हे देखील होते.
भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत जोरदार हवाई हल्ले करतानाच प्रतिबंधित दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मद, लश्कर ए तोयबा आणि हिजबुल मुजाहिद्दीनशी संबंधित नऊ ठिकाणे उद्ध्वस्त केली. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत केलेल्या हवाई हल्ल्याची माहिती कर्नल सोफिया कुरेशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. पहलगाम हल्ल्यातील पीडितांना न्याय देण्यासाठी ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलं. त्यानुसार, दहशतवाद्यांचे नऊ अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले.
भारतीय लष्कराच्या सिग्नल कोरच्या अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी यांनी यापूर्वी अनेक महत्वाच्या मोहिमा यशस्वी केल्या आहेत. ३५ व्या वर्षीच त्यांनी आपल्या अमूल्य कामगिरीनं सर्वांना प्रेरीत केले आहे. मार्च २०१६ मध्ये त्या लेफ्टनंट कर्नल होत्या. त्यावेळी त्यांनी बहुराष्ट्रीय सैन्य सरावात लष्कराच्या तुकडीचे नेतृत्व केले होते. अशी कामगिरी करणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी होत्या. हा भारताकडून केलेला आतापर्यंत सर्वात मोठा आणि महत्वाचा युद्धाभ्यास ठरला आहे.
२ मार्च ते ८ मार्च या दरम्यान पुण्यात आयोजित या युद्धाभ्यासात १८ देश सहभागी झाले होते. त्यात आसियान सदस्य देशांसह जपान, चीन, रशिया, अमेरिका, दक्षिण कोरिया, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांसारख्या देशांचाही समावेश होता.
भारतीय लष्कराच्या अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी या मूळच्या गुजरातच्या रहिवासी आहेत. त्यांचा जन्म वडोदरामध्ये १९८१ मध्ये झाला. बायोकेमिस्ट्रीमधून त्यांनी पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलं. रिपोर्ट्सनुसार, सोफियाचे आजोबा हे लष्करात होते. त्यांच्या वडिलांनीही देखील लष्करात सेवा बजावली आहे.
सोफिया कुरेशी यांची भारतीय लष्करात १९९९ मध्ये निवड झाली. चेन्नईतील ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीमध्ये त्यांचे प्रशिक्षण झाले. २००६ मध्ये सोफिया यांनी कांगोमध्ये संयुक्त राष्ट्र शांती स्थापना मिशनमध्ये सैन्य पर्यवेक्षक म्हणून सेवा बजावली. २०१० मध्ये शांती स्थापना अभियानाशी संबंधित काम केले. पंजाब सीमेवर ऑपरेशन पराक्रममध्ये उत्कृष्ट सेवेसाठी त्यांना जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ म्हणून गौरवण्यात आले. ईशान्य भारतातील पूरपरिस्थितीत बचाव आणि मदत कार्यात त्यांनी केलेल्या कामासाठी त्यांना सिग्नल ऑफिसर इन चीफ सन्मानानं गौरवण्यात आलं.